

महर्षीनगर: शहर आणि उपनगरांतील अतिक्रमणे तसेच अनधिकृत बॅनर, फ्लेक्स आणि होर्डिंगवर कठोर कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिले आहेत. मात्र, बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत काही ठिकाणी कारवाई झाली असली, तरी अनेक भागांत अनधिकृत जाहिरात फलक अद्याप कायम आहेत. त्यामुळे आयुक्तांच्या आदेशांची या भागात प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचे चित्र आहे.
महर्षीनगर, मुकुंदनगर, गुलटेकडी, मार्केटयार्ड, स्लॅबरी पार्क आणि गंगाधाम परिसरात राजकीय तसेच व्यावसायिक बॅनर अद्याप कायम आहेत. त्यामुळे महापालिकेच्या कारभारावर नागरिकांकडून नाराजी व्यक्त होत आहे. आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुक्त प्रजित नायर यांनी अनधिकृत जाहिरात फलकांवर कारवाईचे निर्देश दिले आहेत. दंडाच्या रकमेत वाढ करण्यासह संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
मात्र, मार्केटयार्ड बसडेपो परिसरातील गेल्या २१ नोव्हेंबरला लावण्यात आलेले एका नेत्याच्या वाढदिवसाचे बॅनर अद्याप हटविण्यात आलेले नाहीत. महर्षीनगरमधील भगत चौकातही व्यावसायिक बॅनरबाजी सुरूच आहे. जुन्या बॅनरवर नवीन फ्लेक्स लावण्याचे चित्रही दिसून येत आहे.
अनधिकृत बॅनरवर कारवाईची जबाबदारी आकाशचिन्ह विभागाची असताना या भागात कारवाई का होत नाही, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. सामान्य नागरिकांच्या छोट्या बॅनरवर तातडीने दंडात्मक कारवाई होते; मात्र, राजकीय आणि व्यावसायिकांच्या मोठ्या बॅनरकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोपही होत आहे.
याबाबत आकाशचिन्ह विभागाचे अधिकारी कुशाल साबळे यांनी कारवाई सुरू असल्याचे सांगितले. मात्र, गेल्या दोन दिवसांत एकही दंड वसूल झालेला नसून, गुन्हाही दाखल झालेला नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे केवळ दंड वाढवून उपयोग नाही, तर आदेशांची अंमलबजावणी न करणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत अनेक ठिकाणी अनधिकृत बॅनर आणि फ्लेक्स अद्याप कायम आहेत. हे फलक हटविण्याबाबत अधिकारी कामचुकारपणा का करत आहेत? आयुक्तांनी या प्रकाराची गंभीर दखल घेऊन कर्तव्यात कसूर करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी.
श्रीनाथ भिमाले, अध्यक्ष, स्थायी समिती, महापालिका