पुणे

कुरकुंभ एमआयडीसी चौक झालाय अपघातीस्थळ; सर्व विभागांच्या संयुक्त कारवाईची गरज

अमृता चौगुले

कुरकुंभ : पुढारी वृत्तसेवा

कुरकुंभ (ता. दौंड) एमआयडीसी चौकात वारंवार अपघाताच्या घटना घडत असल्याने अनेकांना जीव गमवावा लागला आहे. काहींना अपंगत्व आले. येथील अपघातांबाबत राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरण, प्रादेशिक परिवहन अधिकारी (आरटीओ), महामार्ग पोलिस, पाटस (ता. दौंड) टोल प्रशासन, कुरकुंभ पोलिसांनी संयुक्तपणे ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे.

पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर कुरकुंभ येथील एमआयडीसी चौकात दिवसेंदिवस अपघात वाढताहेत. काही दिवसांपूर्वी परप्रांतीय मजुरांना करमाळा नगरपरिषदेच्या वाहनाने उडविले. यात मायलेकासह अन्य एका अल्पवयीन मुलाचा जागीच मृत्यू झाला, तर तीन जखमी होते. चार दिवसांपूर्वी दोन मोटार अपघातांत एक ठार, दोन जखमी झाले. अशा अनेक घटना येथे घडल्या आहेत.

भरमसाट टोलवसुली केली जाते. मात्र, उपाययोजनांबाबत पाटस टोल प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप होत आहे.
महामार्गावर पुणे व सोलापूर या दोन्ही दिशेने येणार्‍या वाहनांची प्रचंड वर्दळ सुरू असते. वाहनांचा वेगही सुसाट असतो. या वेगावर नियंत्रण नसते. दोन वाहनांमधील सुरक्षित अंतराचा बहुतांश चालकांना विसर पडला आहे.

समोरील वाहनाला खेटून वाहन चालविणार्‍यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे अपघातांत प्रचंड वाढ होत आहे. बेशिस्त व वेगाने वाहन चालवणार्‍या वाहनचालकावर आरटीओ विभागाने कारवाई केली पाहिजे. एमआयडीसी चौकाच्या पट्ट्यात अनेक अपघात होतात. जीव गमवावा लागतो, पोलिस पंचनामा केला जातो, संबंधितांवर गुन्हे दाखल होतात.

आरोपीला अटक केली जाते. मात्र, अपघातांना आळा घालण्यासाठी प्रयत्न केले जात नाहीत. असे किती दिवस चालणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. वास्तविक, महामार्गावर एखाद्या ठिकाणी वारंवार अपघात घडत असल्यास याबाबत वरील प्रशासनाने घटनास्थळी संयुक्तपणे भेट देऊन तातडीने उपाययोजन करण्याची गरज आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT