पुणे: कोथरूड भागातील एका नामांकित शिक्षण संस्थेत प्रवेश मिळवून देण्याच्या आमिषाने विद्यार्थ्याची पावणेनऊ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एकाविरुद्ध नऱ्हे (सिंहगड रस्ता) ठाण्यात माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका 19 वर्षीय विद्यार्थ्याने फिर्याद दिली आहे.
फिर्यादी तरुण सिंहगड रस्त्यावरील वडगाव बुद्रुक भागात राहायला आहे. 4 ऑक्टोबर रोजी एकाने फिर्यादी तरुणाच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला. कोथरूड भागातील एका नामांकित शिक्षण संस्थेत प्रवेश मिळवून देण्याचे आमिष आरोपीने त्याला दाखविले.
प्रवेशासाठी शैक्षणिक संस्थेला पाच लाख रुपये देणगी तसेच तीन लाख 76 हजार रुपये शैक्षणिक शुल्क भरावे लागेल, अशी बतावणी चोरट्याने केली. त्यानंतर विद्यार्थ्याने याबाबतची माहिती पालकांना दिली. विद्यार्थ्याने शहनिशा न करता पुन्हा आरोपीच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला.
आरोपीने त्याला एका बँक खात्यात पैसे जमा करण्यास सांगितले. चोरट्याच्या खात्यात तरुणाने एकूण मिळून आठ लाख 76 हजार रुपये जमा केले. बँक खात्यात पैसे जमा केल्यानंतर चोरट्याने त्याचा मोबाईल बंद केला.
दरम्यान, आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणाने पोलिसांकडे तक्रार दिली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक शेटे तपास करीत आहेत.