

पुणे: ख्रिसमस गुडी बॅग, गिफ्ट हँपर, गिफ्ट व्हाऊचर, कँडल्स, छोटे ख्रिसमस ट्री, ख्रिसमस शोपीस अन् चॉकलेटपासून ते छोटे ख्रिसमस ट्री असलेला गिफ्ट बॉक्स, अशा वैविध्यपूर्ण भेटवस्तूंच्या खरेदीला ख्रिश्चन समाजबांधव प्रतिसाद देत असून, सणाच्या निमित्ताने भेटवस्तूंच्या खरेदीला सुरुवात झाली आहे.
विविध भेटवस्तूंनी दालने सजली असून, वेगवेगळ्या संकेतस्थळांवरही अनेक प्रकारच्या भेटवस्तू पाहायला मिळतील. सांताक्लॉजची टोपी असो वा लाल रंगातील वॉल हॅगिंग अशा विविध भेटवस्तू कॅम्पसह डेक्कन परिसर, कोरेगाव पार्क आदी ठिकाणच्या दालनांमध्ये उपलब्ध आहेत. चॉकलेट बॉक्स, सांताक्लॉजची टोपी, फोटो फेम, विविध गेम्स... अशा विविध लहान मुलांसाठीच्या भेटवस्तू आणि विविध साहित्य असलेल्या गिफ्ट बॉक्सचीही सर्वाधिक मागणी आहे. इंग््राजी, हिंदी, मराठीतील शुभेच्छापत्रांनाही पसंती मिळत आहे.
ख्रिसमसचा सण काही दिवसांवर आला आहे. आनंदात आणि उत्साहात हा सण साजरा केला जातो. एकमेकांना भेटवस्तू देऊन शुभेच्छा देण्याची रीत ख्रिसमसला असते. तसेच सांताक्लॉजकडून मिळणाऱ्या भेटवस्तूंमुळेही एक वेगळाच आनंद मिळतो. दरवर्षी दालनांमध्ये नानाविध प्रकारच्या भेटवस्तू पाहायला मिळतात आणि वस्तूंच्या खरेदीला चांगला प्रतिसाद मिळतो. यंदाही वेगवेगळ्या प्रकारच्या आणि विशेषत: लाल रंगाच्या भेटवस्तूंनी बाजारपेठा सजल्या आहेत. त्यात छोटे ख्रिसमस ट्री असो लाल रंगातील कप... लहान मुलांसाठी ख्रिसमस गिफ्ट कॉम्बो अन् वॉल हॅगिंगही पाहायला मिळतील.
पण आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरत आहेत ते ख्रिसमसनिमित्त तयार केलेले खास की-चेन्स. या की-चेन्समध्ये ख्रिसमस ट्री, सांताक्लॉज, बेल्स... आदी प्रकार पाहायला मिळतील. कंपनीतील कर्मचाऱ्यांना आणि सहकाऱ्यांना ख्रिसमस भेट देण्यासाठी विविध वस्तू खरेदी केल्सा जात आहेत. छोटे ख्रिसमस ट्री, लाल रंगाच्या बॉक्समध्ये चॉकलेट्स, स्टिकर्ससह घड्याळ, पेन बॉक्स, फोटो फेम, की-चेन अशा वस्तूंचीही मागणी होत आहे, तर ख्रिसमस गिफ्ट बॉक्सलाही पसंती असून, त्यात कँडल्सपासून ते चॉकलेटसपर्यंत विविध वस्तू असल्याने त्याला मागणी आहे. खासकरून सांताक्लॉलची शिदोरीही खरेदी करण्यात येत आहे.
या शिदोरीत चॉकलेट्स, कुकीज, मग, छोटे ख्रिसमस ट्री अन् शुभेच्छापत्र... या विविध वस्तूंचा समावेश असून, खासकरून लाल रंगातील भेटवस्तूंना मागणी अधिक आहे. त्याशिवाय एकमेकांना भेट देण्यासाठी चॉकलेट बॉक्सचीही मागणी आहे. सचिन जाधव म्हणाले, आम्ही ख्रिसमसला एकमेकांना भेटवस्तू देऊन हा दिवस साजरा करतो. दरवर्षीप्रमाणे यंदाही भेटवस्तूंची खरेदी केली असून, त्यामध्ये चॉकलेट्स, फोटो फेम, सांताक्लॉजची शिदोरी... अशा वस्तू खरेदी केल्या.