Kondhwa Garbage Problem Pudhari
पुणे

Pune Kondhwa Garbage Problem: कोंढव्यात कचऱ्याचा विळखा; कौसरबाग रस्ता डंपिंग ग्राउंडसारखा

नागरिक हैराण; दुर्गंधी व डासांचा प्रादुर्भाव वाढला

पुढारी वृत्तसेवा

कोंढवा: परिसरात कचरा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. रस्त्यांवर जागोजागी कचऱ्याचे ढीग साचलेले दिसून येत आहे. कौसरबाग रस्त्याची अवस्था डंपिंग ग््रााऊंड सारखी झाली आहे. उन्हामुळे उकाडा आणि त्यात सुटलेल्या दुर्गंधीमुळे परिसरातील नागरिक हैराण झाले आहेत. तसेच डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.

कोंढवा खुर्द येथील गावठाणातून कौसरबागेकडे जाणारा रस्त्यावर ठिकठिकाणी कचरा साचला आहे. या रस्त्यावर शांताई भाजी मंडई, पोलिस चौकी, महापालिकेचा जलतरण तलाव आणि दशक्रिया घाट असल्याने नागरिकांची सतत वर्दळ असते. मात्र, या रस्त्यावर दररोज कचरा साचल्याचे चित्र दिसून येत आहे. मांसाहारी कचराही या ठिकाणी टाकला जात असल्याने मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरत आहे. या ठिकाणाहून जाताना नागरिक नाकाला रुमाल लावून जातात. दशक्रिया घाटावर येणाऱ्या नागरिकांचही गैरसोय होत आहे.

तसेच पोलिस चौकीत येणारे नागरिकांसह पोलिस अधिकारी आणि कर्मचारीही दुर्गंधीमुळे हैराण झाले आहेत. ही अवस्था केवळ कौसरबाग या एकाच रस्त्याची नाही, तर परिसरातील इतर रस्त्यांचीही स्थिती यापेक्षा वेगळी नाही. परिसरातील रस्ते आणि मोकळ्या जागेवर कचऱ्याचे ढीग साचल्याचे चित्र दिसून येत आहे. परिणामी डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत हडपसर क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक आयुक्त रवी खंदारे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क झाला नाही.

प्रशासनाकडे कचरा व्यवस्थापनाचा अभाव

कोंढव्यातील लोकसंख्या झापाट्याने वाढत असून, त्या तुलनेत महापालिका प्रशासनाकडून कचरा व्यवस्थापन केले जात नसल्याने ही समस्या गंभीर होत आहे. बांधकामांबाबत महापालिकेच्या प्रशासनाची नियमावली आहे. मात्र, अनेक नागरिकांनी याकडे दुर्लक्ष करून अर्ध्या किंवा एक गुंठ्यात पाच मजली इमारती उभ्या केल्या आहेत. त्यामुळे परिसरातील लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून, मूलभूत सुविधा पुरविण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.

ओढ्या-नाल्याचे प्रवाहही अडखळले

गेल्या वर्षी महापालिका प्रशासनाकडून नाले सफाई झाली नसल्यामुळे परिसरातील ओढे आणि नाल्यांत मोठ्या प्रमाणात कचरा साचला आहे. ओढे आणि नाल्यांच्या प्रवाहात ठिकठिकाणी प्लास्टिक साचल्याने त्यांच्या प्रवाहास अडथळा निर्माण झाला आहे. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरल्याने रहिवाशी त्रस्त झाले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT