

पुणे: पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पासाठी जमीन संपादन प्रक्रियेला अखेर वेग येण्याची चिन्हे दिसत आहेत. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) पुढील आठवड्यात निधी जिल्हा प्रशासनाकडे वर्ग करणार असल्याची माहिती समोर आली आहे. आर्थिक संस्थांसोबतची चर्चा अंतिम टप्प्यात असून निधी मिळताच प्रत्यक्ष कामकाज सुरू होणार आहे.
जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सांगितले की, निधी प्राप्त झाल्यानंतर अधिकृत दर जाहीर करून खरेदी-विक्री करारांची प्रक्रिया तातडीने सुरू केली जाईल. सात गावांतील ९० टक्क्यांहून अधिक शेतकऱ्यांची संमती मिळाल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. त्यामुळे प्रकल्पाच्या मार्गातील मोठा अडथळा दूर झाल्याचे मानले जात आहे. या प्रकल्पासाठी पुरंदर तालुक्यातील सुमारे ३ हजार एकर जमीन संपादित केली जाणार आहे.
परगाव, खानवडी, मुंजवडी, एकहटपूर, कुंभारवळण, वनपुरी आणि उदाचीवाडी या गावांचा यात समावेश आहे. जमीन दर निश्चित करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात आले असून निधी जमा झाल्यानंतर व्यवहारांना सुरुवात होईल. दरम्यान, काही शेतकऱ्यांनी भरपाई दर आणि वेळापत्रक स्पष्ट करण्याची मागणी केली आहे. प्रत्यक्ष पैसे मिळाल्यानंतरच प्रक्रिया वेग घेईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. राज्य सरकारने नुकतेच MIDC ला सुमारे ६ हजार कोटींचे कर्ज उभारण्यास मंजुरी दिली असून HUDCO सारख्या संस्थांकडून निधी उभारला जाणार आहे.