दीपक देशमुख
यवत : जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकांचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर जिल्हाभरात जोरदारपणे निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. दौंड तालुक्यात सर्वाधिक लक्षवेधी लढत केडगाव- बोरीपार्धी जिल्हा परिषद गटात होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या गटात दोन आमदार घराणी आमने-सामने येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत..(Latest Pune News)
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून माजी आमदार रमेश थोरात यांचे चिरंजीव तुषार थोरात या गटातून निवडणूक लढवणार, हे जवळपास निश्चित असताना भाजपकडून देखील दिवंगत आमदार काकासाहेब थोरात यांचे नातू अभिषेक थोरात यांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी जोर धरू लागल्याने अभिषेक थोरात यांचे नाव सध्या चर्चेत येऊ लागले आहे.
दोन आमदार घराणी मात्र यामुळे निवडणुकीत एकमेकांच्या समोर उभी राहू शकतात. जिल्हा परिषद आरक्षण जाहीर झाल्यानंतर केडगाव- बोरिपार्धी या गटात सर्वसाधारण आरक्षण निघाल्यानंतर माजी आमदार रमेश थोरात यांच्या चिरंजीवच्या विरोधात तगडा उमेदवार कोण याचा शोध भाजप घेत असताना काकासाहेब थोरात यांचे नातू व धनगर समाजाचे नेते आनंद थोरात यांचे चिरंजीव अभिषेक यांचे नाव पुढं येऊ लागले आहे.
या गटात माजी आमदार रमेश थोरात यांच्या हक्काचे खुटबाव हे निर्णायक मतांची आघाडी देणारे गाव आहे, म्हणूनच खुटबावपेक्षा जास्तीचे मतदान असणाऱ्या बोरीपार्धी गावात भाजप आपली उमेदवारी निश्चित करण्याच्या तयारीत आहे. या घडामोडीमुळे या गटात ’हाय व्होल्टेज’ निवडणूक पाहायला मिळू शकते. गावांचा विचार करता मागील विधानसभा निवडणुकीत या गटात समावेश असणाऱ्या एकेरीवाडी, खुटबाव आणि पडवी या गावांनी माजी आमदार रमेश थोरात यांना आघाडी दिली होती तर या मतदारसंघात मोठी गावे म्हणून ओळख असणाऱ्या केडगाव, बोरीपार्धी या गावांनी भाजप आमदार राहुल कुल यांना आघाडी दिली होती.
देऊळगाव गाडा, खोर ही गावेदेखील आमदार राहुल कुल यांना आघाडी देण्यात पुढे होती. त्यामुळे या निवडणुकीत मोठा संघर्ष पाहायला मिळू शकतो. अभिषेक थोरात यांना भाजपाकडून उमेदवारी मिळाल्यास या संपूर्ण गटात असणारा ओबीसी मतांचा टक्का अभिषेक थोरात यांच्याबरोबर राहील, शिवाय भाजप आमदार राहुल कुल यांच्या मतांची बेरीज अभिषेक थोरात यांना जमेची बाजू ठरू शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.तुषार थोरात यांना माजी आमदार रमेश थोरात यांना मानणारा वर्ग आणि रमेश थोरात यांच्या पराभवाची सहानुभूती याचा फायदा मिळू शकतो. त्यामुळे केडगाव बोरीपार्धी जिल्हा परिषद गटात या वेळी जोरदार लढत पाहायला मिळू शकते.
केडगाव जिल्हा परिषद गटात ‘अभिषेक थोरात विरुद्ध तुषार थोरात’ अशी लढत झाली, तर माजी आमदार रमेश थोरात हे आपल्या चिरंजीवासाठी, तर आमदार राहुल कुल हे अभिषेक थोरात यांना विजयी करण्यासाठी ठाण मांडून बसणार, हे नक्की.
सध्या राज्यभर सुरू असलेल्या आरक्षण आंदोलनामुळे मराठा-ओबीसी समाजात मोठा संघर्ष दिसत असून, यामुळे या दोन समाजांत गावागावांत दुफळी निर्माण झाली असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर ही लढत पक्षाची बंधने वगळून ‘ओबीसी विरुद्ध मराठा’ अशीही होण्याची धोकादायक शक्यता आहे.