

फुरसुंगी : फुरसुंगी-उरुळी देवाची नगरपरिषद निवडणुकीच्या अनुषंगाने प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीमध्ये नाव, पत्ता आणि प्रभागांमध्ये आढळून आलेल्या त्रुटींबाबत नागरिकांकडून हरकतींचा अक्षरश: पाऊस पाडला आहे. रहिवाशांनी प्रशासनाकडे एकूण 18,234 हरकती दाखल केल्या आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने आलेल्या हरकतींची सुनावणी करून वेळेत त्रुटीविरहित अंतिम मतदार याद्या बनविण्याचे मोठे आव्हान आता प्रशासनापुढे असणार आहे.(Latest Pune News)
फुरसुंगी-उरळी देवाची नगरपरिषद निवडणुकीसाठी 16 प्रभागांची मतदारयादी 9 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. मात्र या यादीमध्ये एकाच घरातील मतदारांची नावे विविध प्रभागात आढळून आली. मोठ्या संख्येने दुबार व स्थलांतरितांची नावे यादीत समाविष्ट असल्याचे निदर्शनास आले. काही ठिकाणी दोन प्रभागांच्या लोकसंख्येतही मोठी तफावत पाहायला मिळाली. काही मतदारांची नावे यादीत सापडली नाहीत, याशिवाय नाव, पत्ता, फोटो यांमध्येही अनेक चुका आढळल्यामुळे इच्छुक उमेदवार व मतदारांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती. त्यामुळे मोठ्या संख्येने त्रुटी आढळल्याने अखेर प्रशासनाला हरकतीं दाखल करण्यासाठी मुदत वाढवून द्यावी लागली. या मुदतीत विक्रमी संख्येने हरकती दाखल करण्यात आल्या.
या प्रारूप मतदार यादीवर फुरसुंगी येथील सामाजिक कार्यकर्ते विशाल हरपळे, प्रवीण हरपळे, ज्ञानेश्वर कामठे, नीलेश पवार, राहुल कामठे, गणेश चोरघडे, मयूर हरपळे, नंदू चौधरी, प्रदीप सरोदे यांनी 157 पानी पुराव्यांसह हरकती दाखल केल्या आहे. तसेच नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, निवडणूक विभाग, मंडल अधिकारी, बीएलओ यांनी पुराव्यांची पाहणी करून निष्पक्षपणे त्रुटीविरहित अंतिम मतदार यादी तयार करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
नगरपरिषद प्रशासनाकडे आत्तापर्यंत सुमारे 5 हजार हरकतींवर कार्यवाही करण्यात आली असून, उर्वरित हरकतीही लवकर निकाली काढून अद्ययावत मतदार याद्या 31 ऑक्टोबरपर्यंत प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. त्यानंतर 7 नोव्हेंबरला मतदान केंद्राची यादी आणि मतदान केंद्रनिहाय मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे फुरसुंगी-उरुळी देवाची नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांनी सांगितले.
सध्या हरकतींवर कार्यवाही करण्याचे काम सुरू आहे. मात्र, पुन्हा चुकीच्या पद्धतीने सर्व्हे करून राजकीय दबावाखाली सदोष मतदार यादी बनविल्यास आम्ही न्यायालयात दाद मागणर आहोत.
विशाल हरपळे, सामाजिक कार्यकर्ते, फुरसुंगी
मतदार यादीमध्ये मोठ्या प्रमाणात त्रुटी आहेत. आम्ही पुराव्यांनिशी हरकती दाखल केल्या आहेत. त्यामुळे निवडणूक प्रशासनाने त्याची दखल घेऊन या त्रुटी तातडीने दूर कराव्यात.
प्रवीण हरपळे, रहिवासी, फुरसुंगी