

परिंचे : श्रीक्षेत्र वीर (ता. पुरंदर) येथे लक्ष्मीपूजनाच्या पूर्वीच काही तरुणांनी रात्रभर मद्यधुंद अवस्थेत धुडगूस घातला आहे. याचा त्रास भाविकांना झाल्याने पोलिस प्रशासन आक्रमक झाले आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही तपासून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली आहे.(Latest Pune News)
लक्ष्मीपूजन, अमावास्येनिमित्त वीर येथे भाविकांनी मोठी गर्दी केली होती. यानिमित्त तालुक्यासह जिल्ह्यातील बैलगाडा मालक येथे दर्शनाला येतात. पानवडी, कोडीत, गराडे, नारायणपूर आणि इतर काही भागातून रात्री मुक्कामी बैलगाडी घेऊन बरेच युवक वीरला आले होते. त्यातीलच 40 ते 50 युवकांनी सोमवारी (दि. 20) रात्री दहा ते मंगळवारी (दि. 21) पहाटे 4-5 वाजेपर्यंत परिसरात गोंधळ घातला.
सोमवारी रात्री साडेनऊ वाजता मंदिर बंद होऊन देवाला विश्रांती दिली. या वेळेतच या तरुणांनी प्रचंड हुल्लडबाजी केली. त्यातील बहुसंख्य युवक हे मद्यपान करून आले होते. त्यांनी फटाके फोडले, एकमेकांना शिवीगाळ केली, दुचाकींचा आवाज करत रात्रभर आरडाओरड केली. अनेकांनी गावातच बैलगाड्यांची शर्यत लावण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, त्यांना गावातील काही ज्येष्ठ मंडळी आणि देवस्थान ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचे कुणीही ऐकले नाही. तसेच रात्री परिंचे पोलिस चौकीला संपर्क केला, मात्र तो झाला नसल्याचे नागरिकांनी सांगितले. या प्रकारामुळे गावकऱ्यांची झोप उडाली. मात्र, श्रीक्षेत्र वीर येथील आध्यात्मिक व धार्मिक स्थळाला गालबोट लागल्याचीही चर्चा सुरू झाली आहे.
देवस्थान ट्रस्टच्या वतीने बेकायदेशीर बैलगाडा चालकांवर आणि हुल्लडबाज मद्यधुंद तरुणांवर कारवाई करण्यासाठी सासवड पोलिस ठाण्याला पत्र दिले आहे. त्यावर पोलिसांनी संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची हमी दिली आहे.
राजेंद्र बाप्पू धुमाळ, देवस्थान ट्रस्ट
श्रीक्षेत्र वीर येथे अमावास्येच्या पूर्वसंध्येला बेकायदेशीर बैलगाडामालक आणि मद्यधुंद तरुणांनी रात्रभर धुडगूस घातला आहे. याबाबत धुडगुसाचे ट्रस्ट आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज चेक करून सर्वांवरती गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.
कुमार कदम, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सासवड