

पुणे : सहकुटुंब पारंपरिक वेशभूषेत पूजा-अर्चा, ठिकठिकाणी सुरेल दिवाळी पहाट कार्यक्रम आणि घरोघरी उजळलेले मांगल्याचे, आनंदाचे दीप, अशा चैतन्यपूर्ण वातावरणात बुधवारी (दि. 22) दिवाळी पाडव्याचा सण (बलिप्रतिपदा) साजरा करण्यात येणार आहे. पाडव्यानिमित्त सारसबागेसह ठिकठिकाणी दिवाळी पहाट कार्यक्रमांचे आयोजन केले असून, त्यात गायक-कलाकारांचे सुरेल सादरीकरण रसिकांना अनुभवता येणार आहे.(Latest Pune News)
अनेक जण पाडव्याच्या मुहूर्तावर नवीन वस्तूंच्या, वाहनांच्या खरेदीचे निमित्त साधणार आहेत, तर काही जण नवीन गृहप्रवेश करणार आहेत. पाडव्याला व्यापारी वर्षास सुरुवात होत असल्याने वहीपूजन, दुकानाची पूजा करून नवीन वर्षाचे स्वागत केले जाणार आहे. सकाळी साडेसहा ते साडेनऊ, सकाळी अकरा ते साडेबारा हा वहीपूजनाचा मुहूर्त असणार आहे, असे दाते पंचांगकर्ते मोहन दाते यांनी सांगितले. दिवाळीतील महत्त्वाचा दिवस म्हणजे दिवाळी पाडवा (बलिप्रतिपदा).
पाडव्याच्या दिवशी व्यापारी वर्षाला सुरुवात होत असल्याने वहीपूजन आणि दुकानाची पूजा करून व्यापारी हिशेबाच्या नवीन वर्षास सुरुवात करणार आहेत. तर, घराघरांमध्येही आनंदात आणि उत्साहात पूजा-अर्चा करण्यात येणार आहे. दिवे-पणत्यांचा लख्ख प्रकाश घरोघरी उजळणार आहे. अनेक जण पाडव्याच्या शुभदिवशी सोने खरेदीलाही प्राधान्य देणार आहेत. या दिवशी सुवासिनी पतीचे औक्षण करून पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करणार आहेत, तर पाडव्याला रांगोळीने बळीराजाची प्रतिमा काढून पूजनही होणार आहे. ठिकठिकाणी दीपोत्सवाचेही आयोजन केले आहे.