

पौड : खांबोली (ता. मुळशी) येथील पोल्ट्री फार्मवर अचानकपणे बिबट्या आल्याने सुमारे 300 कोंबड्या दगावल्या असल्याची घटना घडली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. बिबट्या जाळीला धडका मारू लागल्याने कोंबड्या घाबरून सैराभरा पळू लागल्या. यातून भीतीने त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप संबंधित पोल्ट्रीचालकाने केला आहे.(Latest Pune News)
रिहे खोऱ्यातील खांबोली येथे दत्तात्रय विठ्ठल तावरे यांचे पोल्ट्री फार्म आहे. या फार्मवर सोमवारी (दि. 20) पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास बिबट्या आला. त्यामुळे घाबरून गेल्याने सुमारे 300 कोंबड्याचा यात मृत्यू झाला. सुदैवाने यात कोणतीही मनुष्यहानी झाली नाही. मात्र, कोंबड्या मृत्युमुखी पडल्याने तावरे यांचे जवळपास 75 हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे.
याबाबत शेतकरी दत्तात्रय तावरे म्हणाले, सोमवारी पहाटे कोंबड्या ओरडण्याचा आवाज आला. त्यामुळे घरातून बाहेर येऊन पाहिले असता बिबट्या गुरगुरत शेडच्या जाळीवर झडप मारत होता. त्यामुळे कोंबड्या सैरावरा पळू लागल्या. अधिक घाबरून गेल्याने यात 300 कोंबड्या जागीच मृत झाल्या आहेत. दरम्यान, आंधळे येथील हनुमंत मालपोटे यांच्या पोल्ट्रीवर 14 ऑक्टोबरला रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास बिबट्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. मालपोटे यांनी सतर्कता दाखवल्याने बिबट्याने पळ काढला. घटनेबाबत वन विभागाशी संपर्क केला असता तो होऊ शकला नाही.