Railway Passenger Problems Pudhari
पुणे

Kedgaon Railway Passenger Problems: केडगावकरांचा रेल्वे प्रवास अडचणीत; गाड्यांची कमतरता, लोकल सेवेची तीव्र मागणी

12.40 कोटींचा विकासनिधी असूनही प्रवाशांचा कोंडमारा; डेमूला अतिरिक्त डबे व थांबे वाढवण्याची मागणी

पुढारी वृत्तसेवा

रामदास डोंबे

खोर: केडगाव (ता. दौंड) येथील प्रवाशांचा रेर्ल्वेप्रवास गेल्या अनेक वर्षांपासून समस्यांग््रास्त ठरत आहे. पहाटेपासून रात्रीपर्यंतच्या काही गाड्या केडगाव स्थानकावर थांबत असल्या तरी प्रवाशांची संख्या, गरज व रोजच्या प्रवासाचा ताण याच्या तुलनेत गाड्यांची उपलब्धता अत्यंत अपुरी आहे. एकूणच केडगावकरांचा रेल्वे प्रवासाबाबतचा त्रास सुटता सुटेना अशी चिन्हे आहेत.

पहाटे 2:30 वाजता महाराष्ट्र एक्सप्रेस, 5 वाजता सोलापूर पॅसेंजर, 6.30 व 7.30 ला दौंड-पुणे डेमो, 8 वाजता हैद्राबाद-मुंबई एक्सप्रेस अशा गाड्या जरी असल्या तरी मध्यंतरी तासन्तास गाडी न आल्याने प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होते. हैद्राबाद-मुंबई एक्सप्रेस ही एसी गाडी असल्याने पासधारक व तिकिटधारक साध्या जनरल प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतो. जनरल डबे केवळ दोनच असल्याने त्यात प्रचंड गर्दी होते. सकाळी 9 वाजता बारामती-पुणे गाडी मिळते, त्यानंतर थेट संध्याकाळी 5.35 वाजता डेमू असल्याने दिवसभराची अडचण कायम आहे. पुण्यावरून सकाळी 9.40 नंतर येणारी गाडी आणि दुपारी 4.15ला येणारी डेमू ही देखील प्रवाशांसाठी पुरेशी नाही. परिणामी, अनेकांना बस किंवा खासगी वाहनाने पुण्याला जावे लागते. यामध्ये अतिरिक्त खर्च व वेळ वाया जात असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.

दरम्यान, केंद्र सरकारने 12 कोटी 40 लाखांचा निधी केडगाव रेल्वेस्थानक विकासासाठी मंजूर केला असून प्लॅटफॉर्म, शेड, बीज व तिकीट खिडकी सुधारणा सुरू असल्याचे सांगितले जाते; मात्र प्रवाशांना प्रत्यक्ष गरज असलेली गाड्यांची वाढ, लोकल सेवा सुरू करणे हे प्रश्न अजूनही जागेवरच आहेत. प्रवाशांच्या सोयीसाठी डेमूला अतिरिक्त डबे जोडण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. तब्बल 10 वर्षांपासून लोकल सेवेची मागणी होत असताना अद्याप त्यावर कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही, अशी खंत प्रवासी व्यक्त करीत आहेत.

प्रवाशांच्या प्रमुख मागण्या

  • केडगाव स्थानकावर अधिक गाड्यांचे थांबे वाढवावेत.

  • डेमू गाडीला प्रवासी वर्गासाठी अतिरिक्त जनरल डबा जोडावा.

  • पुणे-दौंड लोकल सेवा तातडीने सुरू करावी.

  • प्रवासी सुविधांची प्रभावी अंमलबजावणी करावी.

  • केडगाव रेल्वे स्थानकाचा विकास प्रवाशांच्या सोयीपर्यंत पोहोचला पाहिजे

मी सन 1983 पासून प्रवास करीत आहे. पूर्वीपेक्षा प्रवासाच्या सोयी वाढण्याऐवजी अडचणी वाढल्या आहेत. मध्यंतरी तासन्तास गाडी न मिळाल्याने प्रवाशांचे हाल होत आहे. एसी गाड्यांमध्ये सामान्य प्रवाशांना जागा नाही; जनरल डबे फक्त दोनच, त्यामुळे गर्दी प्रचंड होत आहे. 12 कोटी 40 लाखांचा निधी मिळूनही गाड्यांची उपलब्धता सुधारलेली नाही. लोकल सेवेची मागणी 10 वर्षांपासून सुरू आहे. पण अजूनही लोकल सुरू झालेले नाही.
गोपाळ रावबा जगताप, प्रवाशी, केडगाव-जगताप वस्ती

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT