Kedgaon Methi Crop Damage Pudhari
पुणे

Kedgaon Methi Crop Damage: काढणीच्या काही तास आधीच मेथीवर तणनाशक; केडगावात शेतकऱ्याचे दीड लाखांचे नुकसान

अज्ञात व्यक्तीचा संतापजनक प्रकार; एक एकरावरील उभे पीक उद्ध्वस्त, पोलिसांकडे तक्रार

पुढारी वृत्तसेवा

केडगाव: केडगाव (ता. दौंड) येथील देशमुख मळा परिसरात अज्ञात व्यक्तीने शेतात तणनाशक फवारून उभ्या मेथी पिकाचे नुकसान केल्याची धक्कादायक घटना सोमवारी (दि. १०) सकाळी उघडकीस आली. या घटनेत शेतकरी विपुल गोरख शेळके यांच्या सुमारे एक एकर क्षेत्रावरील मेथी पिकाचे नुकसान झाले असून, अंदाजे दीड लाख रुपयांचा आर्थिक फटका बसल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

विपुल शेळके यांनी आपल्या शेतात मेथीचे पीक घेतले होते. पीक चांगले बहरले असून, सोमवारीच मेथीची काढणी करून ती बाजारपेठेत विक्रीसाठी नेण्याचे नियोजन होते. मात्र, काढणीच्या काही तासांपूर्वीच अज्ञात व्यक्तीने शेतात तणनाशक फवारल्याने संपूर्ण पिकाचे नुकसान झाल्याचे निदर्शनास आले.

सकाळी शेतात गेल्यानंतर प्रकार उघड झाला

सोमवारी सकाळी विपुल शेळके हे नेहमीप्रमाणे आपल्या शेतात गेले असता त्यांना मेथीच्या पिकाची अवस्था संशयास्पद दिसून आली. पिकावर तणनाशकाची फवारणी करण्यात आल्याचे त्यांच्या लक्षात आले. पाहता पाहता एक एकर क्षेत्रावरील मेथीचे पीक खराब झाल्याचे स्पष्ट झाले.

मेथीची काढणी करून त्याच दिवशी बाजारात विक्री करण्याची तयारी करण्यात आली होती. त्यामुळे या घटनेमुळे शेळके कुटुंबाला मोठा आर्थिक धक्का बसला आहे. गेल्या काही दिवसांपासून मेहनत करून वाढविलेले पीक बाजारात नेण्याच्या अगोदरच उद्ध्वस्त झाल्याने शेतकऱ्याने संताप व्यक्त केला आहे.

शेतकऱ्यांमध्ये संताप

शेतकऱ्याच्या उभ्या पिकावर अशा प्रकारे तणनाशक फवारून नुकसान करण्याच्या घटनेमुळे देशमुख मळा परिसरातील शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात खर्च करून, दिवस-रात्र मेहनत घेऊन पीक उभे केले जाते. काढणीच्या टप्प्यावरच अशा प्रकारे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होते. या घटनेमागे नेमका कोणाचा हात आहे, याचा तपास करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यानंतर विपुल शेळके हे सोमवारी सकाळी केडगाव पोलीस चौकीत तक्रार देण्यासाठी हजर झाले होते. अज्ञात व्यक्तीने शेतात तणनाशकाची फवारणी करून मेथी पिकाचे नुकसान केले असून, या प्रकरणाची चौकशी करून संबंधित व्यक्तीवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

पिकाचे नुकसान नेमके किती झाले, फवारणी कोणत्या पद्धतीने करण्यात आली आणि हा प्रकार कोणी केला, याचा तपास पोलिसांकडून करण्यात येणार आहे. परिसरातील शेतांमध्ये अशा प्रकारच्या घटना घडू नयेत, यासाठी पोलिसांनी गस्त वाढवावी, अशी मागणीही शेतकऱ्यांकडून होत आहे.

मेथीचे पीक काढणीसाठी पूर्णपणे तयार झाले होते. सोमवारी काढणी करून बाजारात विक्री करण्याचे नियोजन असतानाच अज्ञात व्यक्तीने तणनाशक फवारल्याने शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. त्यामुळे या घटनेची सखोल चौकशी करून दोषींना तातडीने शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT