पुणे: कात्रज-कोंढवा रस्तारुंदीकरण प्रकल्पाबाबत महापालिकेची आणखी एक मुदत हवेत विरली आहे. जूनअखेर रस्त्याचे काम पूर्ण करून नागरिकांचा प्रवास सुरळीत होईल, असा दावा महापालिका प्रशासनाने केला होता. मात्र, जून महिना संपल्यानंतरही प्रत्यक्षात रस्त्याची स्थिती 'जैसे थे'च असून, आता प्रशासनाने मार्चपर्यंत काम पूर्ण करण्याचे नवे आश्वासन दिले आहे. त्यामुळे महापालिकेच्या कामांवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
२०१७ मध्ये सुरू झालेला हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प जवळपास नऊ वर्षे पूर्ण होण्याच्या उंबरठ्यावर असतानाही अद्याप पूर्णत्वास गेलेला नाही. सुरुवातीला ८४ मीटर रुंदीच्या रस्त्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर आराखड्यात बदल होऊन रुंदी ५० मीटर करण्यात आली. भूसंपादनातील अडथळे, नियोजनातील त्रुटी आणि प्रशासकीय दिरंगाईमुळे प्रकल्प सतत लांबत गेला.
दरम्यान, या मार्गावरील वाहतुकीचा ताण प्रचंड वाढला असून, नागरिकांना रोज खड्डे, धूळ, अरुंद रस्ता आणि वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. सध्या या मार्गावरील अपूर्ण कामांमुळे अनेक ठिकाणी धोकादायक वळणे, खड्डे आणि धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे कात्रज-कोंढवा रस्ता हा नागरिकांसाठी अक्षरशः जीवघेणा मार्ग ठरत असून, वाहनचालकांना दररोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
महापालिकेच्या माहितीनुसार, प्रकल्पासाठी आवश्यक १०९ पैकी ८४ मिळकतींचा ताबा मिळाला असून, उर्वरित २५ मिळकतींचे भूसंपादन अद्याप सुरू आहे. सुमारे ४४ हजार चौरस मीटर जागेचा ताबा मिळाल्यानंतर कामाला अधिक गती मिळेल, असा दावा प्रशासनाने पुन्हा केला आहे.
मात्र, यापूर्वीही अशाच प्रकारची आश्वासने वारंवार देण्यात आल्याने नागरिकांचा प्रशासनाच्या नव्या मुदतीवर फारसा विश्वास राहिलेला नाही. महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी आता प्रकल्प मार्चपर्यंत पूर्ण होईल, असे म्हटले असले; तरी यापूर्वी जाहीर केलेली जूनअखेरची मुदत का पाळता आली नाही? याबाबत प्रशासनाकडे ठोस उत्तर नाही. त्यामुळे कात्रज-कोंढवा परिसरातील नागरिकांमध्ये नाराजी वाढली असून, या वेळी तरी प्रशासन दिलेले आश्वासन प्रत्यक्षात उतरवणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.