Ajit Pawar Farm Katewadi Pudhari
पुणे

Ajit Pawar Farm Katewadi: ‘आमचा कोणच राहिला नाही’ : काटेवाडीत दादांच्या आठवणींनी अश्रूंचा पूर

अजित पवारांच्या जाण्याने फार्मपासून संपूर्ण गाव सुन्न, बापूराव पवारांची भावूक प्रतिक्रिया

पुढारी वृत्तसेवा

काटेवाडी: ‌‘आमचा कोणच राहिला नाही. हक्काचा माणूस निघून गेला. आता बोलण्यात काय अर्थ आहे?‌’ हे शब्द पवार यांच्या फार्मवर गेली 30 वर्षे काम करीत असलेल्या बापूराव पवार यांचे. पवार यांची आठवण सांगताना बापूराव पवार यांचा आवाज हुंदक्यांनी भरून येतो. अजित पवार यांचे घर, शेतीवाडी आणि फार्म पाहणाऱ्या बापूराव पवार यांना आज शब्द कमी पडत आहेत; उरल्या आहेत त्या केवळ अश्रूंनी ओलावलेल्या आठवणी.

“सकाळी नित्यनेमानं दादांशी बोलणं व्हायचंच. आईची तब्येत, शेतीवाडी, कमी-जास्त याची ते नेहमी चौकशी करायचे. माझ्या कुटुंबाचीही आपुलकीनं विचारपूस असायची. दादाच नाहीत तर आता कुणाशी बोलायचं?” असे सांगताना बापूराव पवार अक्षरशः कोसळून पडतात. पहाटे पाच वाजताच दादा तयार व्हायचे. शेतावर फेरफटका मारण्यासाठी आम्ही धावतपळत त्यांच्यासोबत असायचो, अशी आठवण ते सांगतात.

शेतीवर दादांचा विशेष जीव होता. नुकतीच एआय तंत्रज्ञानावर आधारित केळीची मोठ्या प्रमाणात लागवड त्यांनी केली होती. पारंपरिक शेतीकडे दादांचा ओढा कायम असला तरी काळानुसार बदल स्वीकारत त्यांनी ऊसशेतीतही आमूलाग््रा सुधारणा केल्या. शेतात फेरफटका मारताना ते परिसरातील शेतकऱ्यांना थांबवून आपुलकीने चौकशी करायचे. राजकारणाच्या व्यापातूनही वेळ काढून दादा रोज शेतीची माहिती घेत असत. शेतीसोबतच देशी गायींचे पालन,

पोगणूर जातीच्या गायी, स्वच्छता आणि टापटिप यावर दादांचा विशेष कटाक्ष होता. दरवर्षी भाद्रपद पोळ्यानिमित्त ते वेळात वेळ काढून बैलपोळा मोठ्या आनंदात साजरा करायचे. वहिनी, आईसाहेब, शेतमजूर कुटुंबे मुलाबाळांसह सहभागी व्हायची. ‌‘यापुढं आम्ही बैलपोळा कसा साजरा करायचा,‌’ असे म्हणत पुढचे शब्द त्यांच्या तोंडातून फुटलेच नाहीत; हुंदका अनावर झाला.

दादांचा आईसाहेबांवर खूप जीव होता. सकाळी टीव्हीवर विमान दुर्घटनेची बातमी पाहून आईसाहेब अस्वस्थ झाल्या. “दादांना भेटायला दवाखान्यात जाऊया,” असे त्या आग््राहानं म्हणाल्या. त्या प्रेमाची खोली शब्दांत मांडणं कठीण असल्याचं त्यांनी सांगितलं. काटेवाडी गावातील ज्येष्ठ नागरिक, नानासाहेब काटे, बाळकृष्ण काटे, हरिभाऊ वाघ, राजाराम जाधव यांनीही भावना व्यक्त केल्या. “दादा आमचा जीव होते. त्यांच्याबद्दल काय सांगू. बळच उरलेलं नाही,” असे ते म्हणाले.

बाळासाहेब काटे यांनी राजकारणात येणाच्या अगोदरची दादांची आठवण सांगताना पाणीटंचाईच्या काळातील प्रसंग उलगडला. शेतकऱ्यांवर होणारा अन्याय दादांनी थेट पाटबंधारेमंत्र्यांकडे मांडून प्रश्न सोडवला होता. आज काटेवाडी सुन्न आहे. गाव बोलत नाही, गाव रडत आहे. ‌‘आमचा दादा‌’ हरपला आहे. त्यामुळे गाव सुन्न आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT