

पुणे: अप्पा रेणुसे यांच्या शिक्षण संस्थेच्या वतीने देण्यात येणाऱ्या ‘गुरुगौरव’ पुरस्काराच्या कार्यक्रमाचे निमंत्रण कॅबिनेटमंत्री असलेल्या अजितदादांनी स्वीकारले होते. मला हा पुरस्कार स्वहस्ते देण्याची त्यांची इच्छा होती. पण, त्याचवेळी मंत्रिमंडळात काही घडामोडी सुरू झाल्या व कार्यक्रमाला येणे त्यांना शक्य होणार नाही, असे स्पष्ट झाल्यावर तब्बल तीन वेळा फोन करून हा कार्यक्रम पुढे ढकलण्याची विनंती त्यांनी रेणुसे यांना केली होती, अशी आठवण काँग््रेासचे ज्येष्ठ नेते माजी आमदार उल्हास पवार यांनी दै. ‘पुढारी’शी बोलताना अत्यंत दुःखी अंतकरणाने सांगितली.
अजित पवार यांच्याविषयी बोलताना ते म्हणाले की, अजितदादांच्या विनंतीमुळे रेणुसे यांनी 2022 मध्ये होणारा हा कार्यक्रम पुढे ढकलला. परंतु, नंतरच्या वेळीही मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचाली सुरू झाल्याने कार्यक्रमाला उपस्थित राहता येणार नाही, असे त्यांनी रेणुसे यांना कळविले. त्या वेळी ते म्हणाले, उल्हासदादांना माझ्या हस्ते पुरस्कार द्यावा, अशी माझी तीव इच्छा होती. त्यांच्याविषयी मला बोलायचेही आहे, त्यासाठी तयारीही मी केली आहे. परंतु, आता ते शक्य दिसत नाही. तुम्ही कार्यक्रम करून घ्या. या घटनेनंतर मंत्रालयात एकदा अजितदादांची भेट झाली. त्या वेळी आवर्जून ते म्हणाले, ‘दादा मला माफ करा, मी येऊ शकलो नाही.’
कोरोनानंतर बसमधून निघालेल्या पंढरपूरची वारीची एक आठवणही उल्हास पवार यांनी या वेळी सांगितली. कोरोनाच्या काळातही पंढरपूरची पायी वारी झाली पाहिजे, असा दिंडीप्रमुख व देहू-आळंदी देवस्थानचा आग््राह होता. तर, अशा नाजूक परिस्थितीत वारी काढू नये, असे प्रशासनाचे मत होते. परंतु, वारकऱ्यांना हे कसे पटवायचे, हा प्रश्न होता. त्या वेळी जिल्ह्याचे पालकमंत्री असलेल्या अजित पवार यांच्या उपस्थितीत दिंडीप्रमुख व देवस्थानच्या प्रमुखांची एक बैठक जिल्हाधिकाऱ्यांनी आयोजित केली.
मी कसलाही पदाधिकारी नसतानाही दादांच्या सूचनेवरून मला जिल्हाधिकाऱ्यांनी बैठकीला येण्याची विनंती केली. या बैठकीत दादा माझ्याशेजारीच बसले. ते म्हणाले की, मोठ्या साहेबांनीच तुम्हाला बोलावण्यास सांगितले आहे. आता तुम्हीच सर्वांना समजावून सांगा, अशा परिस्थितीत वारी करणे कसे योग्य होणार नाही. त्या वेळी सर्वांशी चर्चा झाली. दादांनी अत्यंत संयमाने, आदराने व कौशल्याने परिस्थिती हाताळली. मीटिंग उत्तमरीत्या पार पडली व निर्णय झाला की, काही प्रमुखांनी रस्त्याने पायी न जाता बसने जाऊन वारी पूर्ण करावी.
अजितदादांनी उपमुख्यमंत्री म्हणून अनेकांबरोबर काम केले. परंतु, तुमचा आवडता मुख्यमंत्री कोण? हे सांगताना ते विलासराव देशमुख यांचे नाव घेत. असे बोलण्यासाठी मोठे धैर्य आणि मनाचा मोठेपणा लागतो. अजितदादांकडे ते होते. प्रश्नांची अचूक जाण, आकलनशक्ती आणि प्रशासनावर वचक असलेले ते नेते होते. कोणत्याही माहितीसाठी ते अधिकाऱ्यांवर अवलंबून नसत. प्रत्येक प्रश्नांचा त्यांचा स्वतःचा अभ्यास होता आणि त्याआधारे निर्णय घेणारे ते दुर्मीळ असे नेते होते, असेही उल्हास यांनी सांगितले.