

पुणे: महाराष्ट्र राज्याचे कणखर, कार्यक्षम आणि खमके नेतृत्व लाभलेले उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं अकाली निधन अत्यंत दुर्दैवी आणि मनाला खोल वेदना देणारं आहे. अजितदादा आपल्यातून निघून गेले आहेत, ही गोष्ट मन अजूनही स्वीकारायला तयार नाही. कोरोना संकटात त्यांनी पक्षीय भिंती बाजूला ठेवून पुणे शहरातील परिस्थिती, उपाययोजना आणि निर्णयप्रक्रियेबाबत सातत्याने संवाद साधला, अशा भावनिक शब्दांत केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाबद्दल शोक व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली.
मोहोळ म्हणाले, माझ्याकडे पुण्याच्या महापौरपदाची जबाबदारी असताना माननीय अजितदादांशी माझा निकटचा आणि आपुलकीचा संबंध निर्माण झाला. त्या काळात उद्भवलेल्या कोरोना संकटात त्यांनी पक्षीय राजकारण बाजूला ठेवून पुणे शहरातील परिस्थिती, उपाययोजना आणि निर्णयप्रक्रियेबाबत सातत्याने संवाद साधला. अनेक महत्त्वाच्या निर्णयांमध्ये त्यांनी मला विश्वासात घेतलं. हे नातं नंतरच्या काळातही कायम राहिलं.
मोहोळ म्हणाले, अगदी अलीकडच्या काळात पार पडलेल्या महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या निवडणुकीतही आदरणीय अजितदादांनी सामोपचाराची भूमिका घेतली. नुकत्याच झालेल्या पुणे महापालिका निवडणुकीदरम्यान आमच्यात आरोप-प्रत्यारोप झाले असतील. मात्र, एकमेकांबद्दल द्वेषाची भावना कधीही नव्हती आणि मनभेदही नव्हते. अजितदादा पवार यांचं जाणं हे महाराष्ट्रासाठी शब्दशः मोठी हानी आहे. आदरणीय अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली.