

मंचर: राज्याच्या राजकारणातील एक धगधगतं नेतृत्व आणि जनसामान्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे ‘दादा’ आज आपल्यात नाहीत, ही वार्ता पचवणं खरोखरच कठीण आहे. कधी कधी नियती इतकी क्रूर असू शकते की, आयुष्यात पहिल्यांदाच एखादी बातमी ‘फेक न्यूज’ ठरावी असं मनापासून वाटू लागतं, अशी प्रतिक्रिया माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राज्याच्या कल्याणासाठी, विकासासाठी आणि इथल्या मातीतील शेवटच्या माणसाच्या प्रगतीसाठी रात्रंदिवस धावणारी पावलं अशी अचानक थांबतील, असं स्वप्नातही कोणाला वाटलं नव्हतं. काळाने आपल्यावर झडप घातली आणि एका पहाडासारख्या व्यक्तिमत्त्वाचा अंत झाला. यामुळे राज्याच्या सामाजिक आणि राजकीय परिघात कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण झाली आहे, अशी भावना वळसे पाटील यांनी व्यक्त केली.
1990 पासूनचा तो काळ माझ्या डोळ्यांसमोरून सरकत आहे. पुणे जिल्हा बँक असो, विधानमंडळ असो किंवा मंत्रिमंडळ. प्रत्येक टप्प्यावर दादांचा सहवास हा मार्गदर्शक आणि ऊर्जा देणारा ठरला. विधानसभेच्या पायऱ्या पहिल्यांदा चढण्यापासून ते राज्याच्या हिताचे मोठे निर्णय घेण्यापर्यंत दादांचा वाटा अत्यंत मोलाचा राहिला. त्यांच्यासोबत काम करताना केवळ प्रशासन समजले नाही, तर अडचणीत असलेल्या माणसाला आधार कसा द्यायचा, हे तंत्रही शिकायला मिळाले. मग तो मतदारसंघातील विकासकामांचा प्रश्न असो किंवा पुणे जिल्ह्याच्या अस्मितेचा, दादा नेहमीच ढाल बनून उभे राहिले, असे वळसे पाटील यांनी सांगितले.
दादांच्या अस्तित्वाने राजकारणात चैतन्य असायचे. त्यांच्या जाण्याने आज महाराष्ट्र एका कणखर आणि लाडक्या नेतृत्वाला मुकला आहे. दादांची काम करण्याची पद्धत म्हणजे एक शिस्तबद्ध ‘अकादमी’ होती. समाजसेवा आणि लोकसेवेसाठी त्यांनी स्वतःला पूर्णपणे वाहून घेतलं होतं. तळागाळातील कार्यकर्त्यापासून ते वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यापर्यंत त्यांची एक घट्ट नाळ बांधली होती, असे वळसे पाटील यांनी सांगितले.
दादांच्या स्वभावातील सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा स्पष्टवक्तेपणा. काम होणार असेल तर ‘हो’ आणि नसेल होणार तर स्पष्ट ‘नाही’ म्हणण्याचं धाडस त्यांच्यात होतं. समोरच्याला खोट्या आशेवर ठेवणं त्यांच्या रक्तात नव्हतं. पक्षसंघटना कशी बांधावी आणि ती तळागाळापर्यंत कशी पोहोचवावी, हे आम्हाला दादांकडूनच शिकायला मिळालं. आज दादा आपल्यात नाहीत ही कल्पनाच करवत नाही. महाराष्ट्राच्या या लाडक्या लोकनेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करताना मन हेलावून जातं, असे वळसे पाटील म्हणाले.