Junnar Tribal Water Crisis Pudhari
पुणे

Junnar Tribal Water Crisis: पश्चिम आदिवासी भागातील पाणीटंचाईवर माई लांडेंचे ठिय्या आंदोलन

डोक्यावर हंडा घेऊन जिल्हा परिषद कार्यालयात धडक; टँकर विलंब आणि जलजीवन मिशनच्या कामांवर गंभीर आरोप

पुढारी वृत्तसेवा

नारायणगाव: जुन्नर तालुक्यातील पश्चिम आदिवासी भागामध्ये तीव पाणीटंचाई निर्माण झाली आहे. येथे शासनाकडून पाण्याचे टँकर नियोजनाअभावी वेळेत पोहचत नाहीत. परिणामी, नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद सदस्या माई लांडे यांनी आक्रमक भूमिका घेत थेट जुन्नरहून डोक्यावर पाण्याचा हंडा घेऊन पुणे जिल्हा परिषद कार्यालय गाठत ठिय्या आंदोलन केले.

पश्चिम आदिवासी भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी दिवसेंदिवस भटकंती करावी लागत आहे. अनेक गावांमध्ये विहिरी आणि पाणवठे कोरडे पडले असून, महिलांना दूरवरून पाणी आणावे लागत आहे. शासनाच्या टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असला, तरी प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे अनेक गावांमध्ये टँकर वेळेवर पोहचत नसल्याच्या तक्रारी सातत्याने होत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये मोठा संताप निर्माण झाला आहे.

याशिवाय, केंद्र शासनाच्या जलजीवन मिशन योजनेअंतर्गत करण्यात आलेल्या कामांबाबतही गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. अनेक गावांमध्ये जलजीवन मिशनची कामे निकृष्ट आणि बोगस पद्धतीने करण्यात आल्याचा आरोप होत आहे. या योजनेअंतर्गत संबंधित ठेकेदारांना 70 ते 80 टक्क्यांपर्यंतची बिले अदा करण्यात आली असली, तरी अनेक गावांमध्ये आजही नागरिकांना नळाद्वारे पाणी मिळत नसल्याची परिस्थिती आहे.

या सर्व प्रकारचा निषेध करण्यासाठी माई लांडे यांनी डोक्यावर पाण्याचा हंडा घेत थेट जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्या कार्यालयात प्रवेश केला. त्यांनी आपल्या भागातील नागरिकांना पिण्याचे पाणी मिळावे, यासाठी ठिय्या आंदोलन करीत प्रशासनाचे लक्ष वेधले. आंदोलनाची तीवता लक्षात घेत मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी तातडीने परिस्थितीचा आढावा घेत संबंधित प्रशासनाला आदेश दिले.

पश्चिम आदिवासी भागात पाण्याचे टँकर वेळेत पोहचवावेत, आवश्यक असल्यास टँकरसंख्या वाढवावी तसेच टँकर वेळेवर पोहचत आहेत की नाही, याचे नियमित रिपोर्टिंग करावे, अशा स्पष्ट सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच, ज्या गावांमध्ये जलजीवन मिशन योजनेची कामे निकृष्ट दर्जाची झाली, त्या सर्व प्रकरणांची तातडीने चौकशी करून संबंधित ठेकेदारांना ब्लॅकलिस्ट करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

अधिकाऱ्यांचा दौरा

पुढील आठवड्यात जिल्हा परिषद पुणे येथील पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना पश्चिम आदिवासी भागाचा प्रत्यक्ष दौरा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या दौऱ्यात गावनिहाय पाणीस्थिती, जलजीवन मिशनची कामे आणि नागरिकांच्या समस्या, यांचा सविस्तर आढावा घेतला जाणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

या वेळी माई लांडे यांनी सांगितले की, माझ्या भागातील नागरिकांना पिण्याचे पाणी मिळालेच पाहिजे, यासाठी माझा लढा सुरू आहे. प्रशासनाने वेळेत उपाययोजना केल्या नाही तर जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत हा प्रश्न अधिक आक्रमकपणे मांडला जाईल. गरज पडल्यास पश्चिम आदिवासी भागातील महिलांना सोबत घेऊन जिल्हा परिषदेसमोर उपोषण आंदोलन करण्यात येईल.
माई लांडे, जिल्हा परिषद सदस्या

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT