पुणे : जुन्नर वन विभागाच्या कार्यक्षेत्रात बिबट्यांचा वाढलेला प्रादुर्भाव कमी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विविध उपाययोजना राबविल्या आहेत. त्यासाठी सुमारे १३ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून असून त्यातून पिंजरे उभारणी, बचाव व गस्ती यंत्रणा, जनजागृती, तसेच आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित व्यवस्थापन केले जात आहे. यामुळे अतिशय कमी वेळेत ६८ बिबटे पकडण्यात यश आले आल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.
येत्या काळात मानव–बिबट संघर्ष मोठ्या प्रमाणात कमी होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे. या यशामागे उपवनसंरक्षक प्रशांत खाडे व महादेव मोहिते यांचे विशेष योगदान असल्याचेही त्यांनी सांगितले.
जुन्नर वन विभागात जुन्नर, ओतूर, शिरूर, घोडेगाव, मंचर, राजगुरुनगर आणि चाकण या वनपरिक्षेत्रांचा समावेश होतो.
सन २०२५-२६ मध्ये बिबट्यांच्या हल्ल्यांत ५ जणांचा मृत्यू झाला असून, त्यांच्या कुटुंबियांना ६५ लाख रुपये मदत देण्यात आली आहे. तसेच ५ जखमींना २ लाख १८ हजार ९६४ रुपयांची मदत करण्यात आली. तर १,६५७ जनावरांच्या मृत्यूपोटी व पिकांच्या नुकसानीसाठी मिळून एकूण २ कोटी ३८ लाख १५ हजार ७५३ रुपयांची नुकसानभरपाई देण्यात आली आहे.
मे २०२४ पासून जुन्नर येथील विभागीय कार्यालयात नियंत्रण कक्ष (टोल फ्री क्रमांक १८००-३०३३) सुरू करण्यात आला आहे. तो २४ तास कार्यरत आहे. या माध्यमातून अतिसंवेदनशील क्षेत्रांची माहिती संकलित करून गस्तीबाबत सूचना दिल्या जात आहे. केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरण, नवी दिल्ली यांच्या मंजुरीनंतर जुलै २०२४ मध्ये संघर्ष क्षेत्रातील १० बिबट्यांचे जामनगर (गुजरात) येथील बचाव केंद्रात स्थलांतर करण्यात आले. मेंढपाळ व ऊसतोड कामगारांच्या सुरक्षिततेसाठी ४१० सौर दिवे व ४१० तंबू (टेंट) वितरित करण्यात आले आहेत. शिरूर व मंचर वनपरिक्षेत्रातील एकूण ५० ही व्यवस्था सुरू करण्यात आली आहे,
वन विभागातील २३३ अतिसंवेदनशील गावांना “संभाव्य बिबट आपत्तीप्रवण क्षेत्र” म्हणून घोषित करण्यात आले आहे. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन योजनेच्या धर्तीवर शेतातील एकटी घरे व गोठ्यांसाठी सौर ऊर्जा कुंपण हा पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येत आहे. आतापर्यंत १५० घरांना सौर ऊर्जा कुंपण बसविण्यात आले आहे. आणखी ५५० घरांना या कुंपणाद्वारे सुरक्षा देण्यात येणार आहे. सध्या विभागात एकूण ४०० पिंजरे कार्यान्वित आहेत. ४०० 'आपदा मित्र' व प्राथमिक बचाव दल सदस्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. नागरिकांना ३ हजार ३०० नेक गार्डचे वाटप करण्यात आले आल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.