पुणे: पुण्यातील इंटर- युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ॲस्ट्रॉनॉमी अँड ॲस्ट्रोफिजिक्स (आयुका) च्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या मीरकॅट 'ॲप्सॉप्शन लाईन सर्व्हे' या महत्त्वाकांक्षी रेडिओ खगोलशास्त्रीय प्रकल्पाच्या डेटाला आता जर्मनीतून दीर्घकालीन प्रसारण मिळणार आहे. यामुळे जगभरातील संशोधकांना या महत्त्वपूर्ण डेटाचा अधिक सुलभतेने वापर करता येईल.
दक्षिण आफ्रिकेतील मीरकॅट नामक रेडिओ दुर्बिणीद्वारे केलेल्या या प्रकल्पातून सुमारे १.५ पेटाबाइट्स इतका प्रचंड अप्रक्रियित डेटा जमा झाला आहे. २०२५ अखेरपर्यंत या प्रकल्पासाठी नियोजित १४०० तासांचे निरीक्षण पूर्ण झाले आहे. या डेटावर प्रक्रिया करून तो आयुकामध्ये संग्रहित केला जात आहे.
काय होणार फायदा...
सुरुवातीच्या काळातील आकाशगंगांचा अभ्यास करणे शक्य होईल.
आयुका आणि जर्मनीतील डीझेडएमधील माहिती-तंत्रज्ञान पथकांच्या सहकार्याने ही डेटा-मिरर सुविधा उभारण्यात आली आहे.
आधुनिक रेडिओ दुर्बिणींमधून निर्माण होणाऱ्या प्रचंड प्रमाणातील डेटाचे व्यवस्थापन आणि जगभरातील संशोधकांना ते उपलब्ध करून देण्यासाठी ही सुविधा महत्त्वाची ठरणार आहे.
१.५ पेटाबाइट डेटाचा दीर्घकाळ जागतिक वैज्ञानिक समुदायाला उपयोग करता येईल. - प्रमुख संशोधक प्रा. नीरज गुप्ता (आयुका) यांनी सांगितले की, या डेटाच्या मदतीने आकाशगंगांची उत्क्रांती, ताऱ्यांच्या निर्मितीसाठी आवश्यक वायू, आंतरतारकीय माध्यम, तसेच विश्वातील मोठ्या प्रमाणावरील संरचनेचा अभ्यास करण्यास संशोधकांना मदत होणार आहे.
भारताच्या संदर्भातील उपयुक्त मुद्दे
भारताने उभारलेली आणि भारतातच कार्यरत असलेली पायाभूत सुविधा असून या प्रकल्पाचे नेतृत्व आयुका करीत आहे. आयुकाने विकसित केलेल्या डेटा पाइपलाइनच्या माध्यमातून प्रकल्पाच्या संपूर्ण १.५ पेटाबाइटच्या संग्रहावर प्रक्रिया केली जाते. जगभरातील कोणताही वैज्ञानिक भारतातील विद्यापीठांमध्ये किंवा इतरत्र त्याच डेटावर पुन्हा प्रक्रिया करून वेगळ्या वैज्ञानिक उद्देशासाठी त्याचा वापर करू शकतो.