Divorce Case Pudhari
पुणे

IT Couple Divorce: ‘तुझं तू, माझं मी’ फंड्यामुळे आयटी दाम्पत्याचा संसार मोडला; न्यायालयाने दिला घटस्फोट

नाष्ट्याच्या बिलापासून भेटवस्तूंच्या खर्चापर्यंत अर्धा वाटा मागण्यावरून वाढले मतभेद; अवघ्या नऊ दिवसांत प्रकरण निकाली

पुढारी वृत्तसेवा

पुणे: 'तुझं तू, माझं मी' (टीटीएमएम) या आर्थिक फंड्याच्या अवलंबनामुळे एका आयटी दाम्पत्याच्या संसाराला कौटुंबिक न्यायालयाने पूर्णविराम दिला. नाष्ट्याच्या बिलापासून भेटवस्तूंच्या खर्चापर्यंत प्रत्येक गोष्टीचा अर्धा वाटा मागणाऱ्या पतीमुळे वाढलेले मतभेद अखेर न्यायालयापर्यंत पोहोचले. प्रेम, विश्वास आणि आपुलकीपेक्षा या प्रकरणात खर्चाचा हिशेबच महत्त्वाचा ठरला अन् संसाराचा शेवट घटस्फोटात झाला.

वैभव आणि वैभवी (दोघांचीही नावे बदललेली) दोघेही आयटी क्षेत्रात कार्यरत. मे २०२३ मध्ये घरच्यांच्या पसंतीने विवाह झाल्यानंतर काही महिन्यांत दोघांमध्ये आर्थिक बाबींवरून सतत वाद होत होते. पतीचे उत्पन्न पत्नीपेक्षा अधिक असतानाही तो प्रत्येक खर्चाचा काटेकोर हिशेब ठेवत होता. हॉटेलमधील नाष्टा-जेवण, सहली, भेटवस्तू तसेच इतर कौटुंबिक खर्चांमध्ये पत्नीने अर्धा वाटा उचलावा, असा त्याचा आग्रह असे. तसेच, पत्नी माहेरी आर्थिक मदत करते, या संशयावरून वारंवार वाद होत होते.

पत्नीच्या दाव्यानुसार, पतीने दिलेल्या भेटवस्तूंच्या खर्चातही तिने समान हिस्सा द्यावा, अशी त्याची भूमिका होती. यादरम्यान मतभेद वाढत गेल्याने नात्यात दुरावा निर्माण झाला आणि गेल्या वर्षभरापासून त्यांच्यात वैवाहिक संबंधही राहिले नव्हते. संवादाचा अभाव, एकमेकांना वेळ न देणे आणि आर्थिक कारणांवरून होणारे सततचे वाद, यामुळे अखेर त्यांनी परस्परसंमतीने विभक्त होण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी ॲड. प्राजक्ता तारू यांच्यामार्फत घटस्फोटाचा दावा दाखल केला होता. त्यांना ॲड. सागर गिरी आणि ॲड. वैष्णवी मडेल यांनी सहकार्य केले.

पतीनेच केला घटस्फोटाचा खर्च

परस्परसंमतीने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केल्यानंतर हे प्रकरण अवघ्या नऊ दिवसांत निकाली निघाले. १३ मे रोजी दावा दाखल झाला आणि २२ मे रोजी न्यायालयाने निकाल दिला. दोन्ही बाजूंची भूमिका स्पष्ट असल्याने पहिल्याच सुनावणीत आदेश देण्यात आला. त्यामुळे दीर्घ न्यायालयीन प्रक्रियेऐवजी दोघांनाही तातडीने दिलासा मिळाला. विशेष म्हणजे, घटस्फोट प्रक्रियेचा संपूर्ण खर्च पत्नीने उचलला.

आर्थिक स्वातंत्र्य आणि वैवाहिक नात्यातील अपेक्षा, यामध्ये समतोल साधला गेला नाही. त्यातून या जोडप्याचे वाद वाढत गेले आणि त्यांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला. दोघे एक वर्षाहून अधिक काळ विभक्त राहत असल्याने हे प्रकरण त्वरित निकाली काढले.
प्राजक्ता तारू, दाम्पत्याचे वकील

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT