दत्तात्रय नलावडे
खडकवासला / पुणे : पूर्वीचा प्रभाग क्रमांक 34 मधील धायरी, वडगाव खुर्दचा काही भाग, तसेच नव्याने समावेश केलल्या नर्हे व नांदेड गावच्या काही भागांसह किरकटवाडी, नांदोशी व खडकवासला गावांचा समावेश करून नवीन प्रभाग क्रमांक 53 खडकवासला – नर्हे तयार झाला आहे. आगामी निवडणुकीत प्रभागातील समीकरणे बदलणार आहेत. भाजपसमोर राष्ट्रवादीचे आव्हान उभे राहणार आहे. याशिवाय शिवसेना, मनसे व वंचित विकास आघाडी व इतर पक्ष, तसेच अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरणार्यांची संख्यासुद्धा मोठी असणार आहे.
गेल्या पालिका निवडणुकीत वडगाव-धायरी असा प्रभाग होता. त्यातील वडगाव बुद्रुकचा मोठा भाग नवीन प्रभागात नाही. धायरी व इतर भागासह नव्याने समाविष्ट करण्यात आलेली गावे आहेत. गेल्या निवडणुकीत भाजप, राष्ट्रवादीने भौगोलिक समतोल राखत उमेदवारी दिली होती. तिथे भाजपचे चारही उमेदवार निवडून आले.
समाविष्ट गावापेक्षा जुन्या हद्दीतील मतदारांची संख्या अधिक आहे. असे असले तरी समाविष्ट गावातच इच्छुकांची संख्या मोठी आहे. नर्हेचा अपवाद वगळता इतर गावांचा सलगपणे नवीन प्रभागात समावेश करण्यात आला आहे. धायरी भागात मतदार अधिक असले, तरी नांदेड, नर्हे, खडकवासला व किरकटवाडीकरांची भूमिका या प्रभागात निर्णायक ठरणार आहे.
प्रभागात गावकर्यांसह सोसायट्या, मध्यमवर्गीयासह झोपडपट्या, मजूर, कष्टकरी मतदार आहेत. जुन्या हद्दीतील सोसायट्यांची व नवीन भागातील गावकर्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. सत्ता कायम राखण्यासाठी भाजपने जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली आहे, तर राष्ट्रवादीने जुना गड पुन्हा काबीज करण्यासाठी सर्वच इच्छुकांना आतापासूनच गोंजारण्याचे काम सुरू केले आहे. भाजप, राष्ट्रवादीबरोबर शिवसेना, मनसे, तसेच काँग्रेस व इतर पक्षांच्या इच्छुकांचे बँनर, शुभेच्छा फलक प्रभागात लागले आहेत. भाजपने जिल्हा परिषदेच्या दोन्ही जागा जिंकल्या होत्या, तर पंचायत समितीत भाजप, शिवसेनेला यश मिळाले.
भाजपकडून राजाभाऊ लायगुडे, राजश्री नवले, जयश्री पोकळे, अशोक मते, अतुल चाकणकर, सुनील हगवणे, अनिल मते , काजल हगवणे, सुशांत कुटे, सागर भूमकर, माधुरी चाकणकर, रूपेश घुले आदी इच्छुक आहेत. राष्ट्रवादीकडून स्वाती पोकळे, सौरभ मते, संतोष चाकणकर, कुणाल पोकळे, तृप्ती पोकळे, नरेंद्र हगवणे, राहुल घुले पाटील, आनंद मते, भूपेंद्र मोरे, तर शिवसेनेकडून विलास मते, गोकुळ करंजावणे, नीलेश गिरमे, संदीप मते, मनसेकडून शिवाजी मते, महादेव मते, रमेश करंजावणे, विजय मते, कालिदास चावट, रितेश जाधव इच्छुक आहेत. याशिवाय नांदेड सिटीचे संचालक उमेश कारले, अविनाश लगड हेसुद्धा इच्छुक आहेत. इथे मराठा, माळी समाज अधिक आहे; तसेच बौद्ध, इतर समाजाची संख्याही आहे.
नर्हे गावठाण ते पारी कंपनी, वेताळबुवा चौक, मानाजीनगर, गोकुळनगर, धायरी फाटा, सणस शाळा ते उंबर्या गणपती चौक, दळवीवाडी, नांदेड गावठाण, नांदेड सिटीचा काही भाग, जेपीनगर, गोसावी वस्ती, नांदोशी, किरकटवाडी, खडकवासला.