रशिया-युक्रेन तणाव : युक्रेनमधून २४२ भारतीय मायदेशी परतले | पुढारी

रशिया-युक्रेन तणाव : युक्रेनमधून २४२ भारतीय मायदेशी परतले

नवी दिल्ली, पुढारी ऑनलाईन : रशिया आणि युक्रेनमध्ये (Russia-Ukraine) तणावाची परिस्थिती चिघळली असून युद्धाचे ढग घोंगावू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर युक्रेनमधील भारतायींना मायदेशी परतण्याच्या सूचना भारताच्या परराष्ट्र खात्याने दिल्या होत्या. दरम्यान, युक्रेनमध्ये वास्तव्यास असणाऱ्या २४२ भारतीयांना एअर इंडियाच्या विमानाने मंगळवारी रात्री दिल्ली विमानतळावर आणण्यात आले.

रशिया-युक्रेनमधील (Russia-Ukraine) परिस्थिती दिवसेंदिवस चिघळू लागली आहे. त्यामुळे भारत सरकारने भारतीयांना मायदेशी परतण्याचे आवाहन केले होते. त्यासाठी अतिरिक्त विमानांची उड्डाणे करण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला आहे. युक्रेनमधील भारतीय दुतावासाने युक्रेनच्या कीवमधून ते दिल्लीपर्यंत अतिरिक्त विमान वाहतूक करण्याची मागणी भारत सरकारकडे केली आहे. त्यानुसार २५ आणि २७ फेब्रुवारी आणि ६ मार्चला विमानांची उड्डाणे करण्यात येणार आहेत. तर २४ आणि २६ फेब्रुवारीला बोरिस्पिल विमानतळावरून भारतात विमान सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, युक्रेनमधून २४२ भारतीय मंगळवारी रात्री ११.४० वाजता दिल्लीत दाखल झाले आहेत.

युक्रेनमधून (Ukraine) भारतात मंगळवारी आलेल्या भारतीयांमध्ये सर्वाधिक विद्यार्थ्यी आहेत. भारतात सुरक्षित आणि सुखरुप पोहोचल्यानंतर विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला आहे. तर त्यांच्या कुटुंबियांनीही सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. युक्रेन-रशियात तणाव निर्माण झाल्यानंतर भारतातील आई-वडील काळजीत पडले होते. आमच्या सुरक्षेबद्दल त्यांना चिंता लागून राहिली होती. त्यामुळे भारतात परतल्यानंतर आनंद होत असल्याचे एका विद्यार्थिनीने सांगितले. युक्रेनमध्ये सध्या सामान्य परिस्थिती असली तरी पुढील काळात काहीही होऊ शकते, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे आम्ही भारतात तातडीने परतण्याचा निर्णय घेतला, असे एका विद्यार्थ्याने सांगितले.

 

Back to top button