Savkari 
पुणे

पुण्यातील गल्लीबोळात बोकाळलीय अवैध सावकारी

अमृता चौगुले
  • पोलिस राबविणार विशेष मोहीम; तक्रारदारांसाठी हेल्पलाइन

  • तक्रारदारच पुढे येत नसल्याने वर्षभरात केवळ 17 गुन्हे दाखल

  • फक्त 1100 लोकांकडेच सावकारीचा परवाना

पुणे : अशोक मोराळे : मुंबईपेक्षाही आकाराने मोठे झालेल्या पुणे शहरात केवळ अकराशे सावकार परवानाधारक आहेत. मात्र, गल्लीबोळांतून अवैध सावकारांची सावकारी गेल्या अनेक वर्षांपासून बिनदिक्कतपणे सुरू आहे. याची दखल घेत खुद्द पोलिस आयुक्तांनीच आता अवैध सावकारी मोडून काढण्याचा विडा उचलला असून, 'ऑपरेशन सावकारी' ही विशेष मोहीम हाती घेतली आहे.
सर्वसामान्य नागरिकांच्या आर्थिक अडचणी व दुर्बलतेचा फायदा घेत शहरात फोफावत चाललेली अवैध सावकारी अनेकांच्या संसाराची राखरांगोळी करीत आहे. दिलेल्या रकमेवर व्याजाच्या मोबदल्यात दहापट पैसे वसूल केले, तरी या सावकारांची भूक काही केल्या थांबत नसल्याचे चित्र आहे. अनेकांनी नैराश्यातून आत्महत्येचा मार्गसुद्धा स्वीकारला आहे.

अवैध सावकारांची कुंडली तयार

सराइत गुन्हेगाराबरोबरच संघटित गुन्हेगारीचा बंदोबस्त केल्यानंतर पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी आपला मोर्चा आता अवैध सावकारीविरोधात वळविला आहे. गुन्हे शाखेचे अपर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणीविरोधी पथकाच्या खांद्यावर अवैध सावकारीचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यानुसार पोलिसांनी अधिकृत सावकारी करणार्‍या सावकारांसोबतच अवैध पद्धतीने सावकारी करणार्‍यांची माहिती जमा करण्यास सुरुवात केली आहे. पोलिसांच्या पुढाकारातून तक्रारदारांसाठी हेल्पलाइन मोबाईल क्रमांक देण्याचे ठरविले आहे.

बचत गटांकडूनही सावकारी

घरकाम करणार्‍या महिलेपासून ते अनेक व्यापारी, उद्योजकही खासगी सावकाराकडून व्याजाने पैसे घेतात. मात्र त्यांच्या व्याजाचा दर एवढा प्रचंड असतो की, कर्जदार अक्षरश: वाकून मरून जातो. शेवटी मोठी रक्कम हवाली करूनही कर्ज फिटत नाही आणि सावकाराचा तगादाही संपत नाही, अशी स्थिती येते. शहरातील सर्व झोपडपट्ट्या, गल्ली-बोळात, व्यापारी पेठांत अवैध सावकारांचा सुळसुळाट झाला आहे. किरकोळ विक्रेत्याला सकाळी पाचशे रुपये व्यवसायाला दिले की, रात्री व्यवसाय संपल्यावर त्याच्याकडून सहाशे ते सातशे रुपये गोळा करणारे सावकार आहेत. भिशी, लिलाव भिशी, बचत गटाच्या माध्यमातूनही खासगी सावकारी शहरात फोफावते आहे.

गुन्हेगार पंटरकडून व्याजवसुली

मुद्दल न फिटता व्याजानेच कर्जदार मेटाकुटीला येतो आहे. पाच लाखांपासून कोटी रुपये देणारेही बडे सावकार आहेत. त्यासाठी कोरा स्टँप, जमिनी, बंगले नावावर करून घेतले जातात. दर महिन्याला व्याजवसुलीसाठी गुन्हेगार पंटर नेमले जातात. व्याज न दिल्यास संबंधित व्यक्तीच्या घरातील साहित्य फेकून देणे, कर्जदाराला ताब्यात घेऊन मारहाण करण्याचे प्रकार घडत आहेत.

गुन्हे शाखेच्या सर्वाधिक कारवाया

चालू वर्षात अवैध सावकारीचे 17 गुन्हे दाखल झाले असून, त्यातील बहुतांश कारवाया गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाकडून करण्यात आल्या आहेत.

''अवैध सावकारीतून नागरिकांची पिळवणूक होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर, आता आम्ही त्याविरोधात कडक मोहीम राबवत आहोत. अशी बेकायदा सावकारी थांबवण्यासाठी नागरिकांनीदेखील न घाबरता समोर येऊन तक्रार करण्याची गरज आहे.''

                                                                                                                     – अमिताभ गुप्ता, पोलिस आयुक्त, पुणे शहर

काय सांगतो सावकारीचा कायदा?

  • बेकायदा सावकारीला आळा घालण्यासाठी शासनाने महाराष्ट्र सावकारी (नियमन) अध्यादेश 2014 हा सुधारित कायदा संपूर्ण राज्यभर लागू केला.
  • नवीन नियमानुसार विनापरवाना सावकारी करणार्‍या व्यक्तीला होऊ शकते पाच वर्षांपर्यंत कैदेची शिक्षा किंवा 50 हजार रुपयांपर्यंतचा दंड.
  • परवानाधारक सावकारांनाही कायदा आणि नियमाचे पालन बंधनकारक.
  • सावकाराने जर शेतकर्‍याला तारण कर्ज दिले, तर ते वार्षिक 9 टक्के दराने देणे बंधनकारक आहे.
  • शेतकर्‍याला विनातारण कर्ज दिले तर ते 12 टक्के व्याजदर लावू शकतात.
  • इतर व्यक्तींसाठी तारण कर्जावर सावकार वार्षिक 15 टक्के व्याजदर, तर विनातारण कर्जावर वार्षिक 18 टक्के व्याजदर घेऊ शकतो. त्यापेक्षा अधिक व्याजदर घेणे कायद्याने गुन्हा आहे.
  • दरवर्षी सावकारी परवान्याचे नूतनीकरण करणे बंधनकारक.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT