

चंद्रपूर ; पुढारी वृत्तसेवा
तीन वर्षाच्या नर बिबट्याचा अन्य बिबट्या किंवा वाघासोबत झालेल्या झुंजीत मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना आज (गुरूवार) सकाळी उघडकीस आली.
या विषयी अधिक माहिती अशी की, सिदेवाही वनपरिक्षेत्र अंतर्गत डोंगरगाव बिटात कंपार्टमेंट नंबर 1361 मध्ये अंदाजे तीन वर्षे वयाचा नर बिबट्या मृतावस्थेत आढळून आला. सकाळी डोंगरगाव बीटाचे वनरक्षक चहांदे हे गस्तीवर असताना त्यांना एक नर बिबट मृतावस्थेत आढळून आला. त्याच्या शरीरावर जखमा आढळून आल्या असून, शरीरावरील जखमांची परिस्थिती बघता दुसऱ्या बिबट्याशी किंवा वाघाशी झुंज होऊन त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वनविभागाने वर्तविला आहे.
सदर घटनेची माहिती वनविभागाला मिळताच अधिका-यांनी येवून पंचनामा केला. बिबट्याच्या मृतदेहाचे शव विच्छेदन करण्यात येणार आहे. पंचनाम्याच्या ठिकाणी वनपरिक्षेत्र अधिकारी शविशाल सालकर, मानद वन्यजीव रक्षक विवेक करंबेकर, सहाय्यक वनसंरक्षक ब्रह्मपुरी वाकडे आदी उपस्थित होते. सदर बिबट्याच्या मृत्यूचे कारण पुढे आले नसले तरी त्याचा शरीरावरील जखमावरून या बिबट्याची झूंज एखाद्या बिबट्या किंवा वाघासोबत झाली असावी, त्यात त्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
हेही वाचलं का?