बाणेर : शहर विद्रूप करणाऱ्या अनधिकृत फ्लेक्सबाजीवर कारवाई करण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी क्षेत्रीय कार्यालयाला दिले आणि कारवाईला सुरुवात झाली आहे.(Latest Pune News)
त्यामुळे चौकाचौकांत झळकणारे फ्लेक्सचे आता सांगाडेच राहिले आहेत. आयुक्तांच्या आदेशानुसार आता कारवाईला सुरुवात झाली असून, ही कारवाई किती दिवस सुरू राहणार, याकडे मात्र सर्वांचे लक्ष लागले आहे. कार्यक्रम होण्याआधी कार्यक्रमाचे बोर्ड निघाले तर अनधिकृत बोर्ड लावण्याचे प्रमाणही कमी होईल, असे मत नागरिक व्यक्त करीत आहेत.
सध्या आकाशचिन्ह विभागामार्फत औंध, बाणेर क्षेत्रीय कार्यालयांतर्गत अनधिकृत फ्लेक्सवर कारवाई करीत चार जाहिरातदारांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले. परंतु, यामध्ये व्यावसायिक जाहिरातदारांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. राजकीय अनधिकृतपणे फ्लेक्स लावणाऱ्यांवरही गुन्हे दाखल होणार का? हे पाहावे लागणार आहे.
पुणे महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बीपी यांनी स्वतः परिमंडल चारमध्ये भेटी दिल्या. त्यामध्ये त्यांनी दिलेल्या सूचनांनुसार बुधवारी दिनांक 8/10/2025 रोजी उपायुक्त परवाना आकाशचिन्ह विभाग माधव जगताप यांच्या आदेशानुसार, परिमंडल 2 उपायुक्त संतोष वारुळे, महापालिका सहाय्यक आयुक्त गिरीश दापकेकर यांच्या मार्गदर्शनाखाली परवाना निरीक्षक योगेश काकडे, परवाना निरीक्षक अमोल जोरे, परवाना निरीक्षक शरद हिले, संतोष कोळपे, चंद्रकांत भोसले यांच्या टीममार्फत बोपोडी चौक, आंबेडकर चौक, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पहाड, मांडववर कारवाई करण्यात आली. तसेच, 4 जाहिरातदारांवर गुन्हा नोंदविण्यात आले.
अनधिकृतरीत्या लावण्यात येणाऱ्या फ्लेक्समुळे परिसर विद्रूप होत आहे. त्यामुळे या अशा अनधिकृत जाहिरातदारांच्या विरोधात सातत्याने कारवाई करणे गरजेचे आहे. अनेकवेळा पुणे महानगरपालिकेतर्फे कारवाई केल्यानंतर लगेच एक-दोन दिवसांत पुन्हा परिसर फ्लेक्सने भरून जात आहे. त्यामुळे अशा अनधिकृत फ्लेक्सवर सातत्याने कारवाई करून आजच्या जाहिरातदारांवर गुन्हे दाखल करावेत, असे परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे.
‘औंध, बाणेर, बालेवाडी, पाषाणकडेही लक्ष द्या’
औंध रोड, बोपोडी या ठिकाणी ज्या पद्धतीने अनधिकृत बॅनरवर कारवाई करण्यात आली, तशीच कारवाई औंध, बाणेर, बालेवाडी, पाषाण भागात करण्यात यावी. येथील बोर्ड, बॅनर आयुक्तांच्या आदेशानंतर आतातरी कार्यक्रमाआधी निघणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.