

पुणे : इलेक्ट्रॉनिक्स, सौरऊर्जा आणि मेडिकल उपकरणांमध्ये वाढलेला चांदीचा वापर याखेरीज सुरक्षित गुंतवणूक म्हणून चांदीकडे वाढलेला कल, त्यातुलनेत चांदीचा कमी पुरवठा या सर्वांचा परिणाम चांदीच्या दरावर होत आहे. गुरुवारी शहरातील सराफा बाजारात चांदीच्या किलोचे भाव तब्बल 1 लाख 72 हजार रुपयांवर पोहचले. एका दिवसात चांदीच्या दरात 12 हजार 380 रुपयांनी झालेली वाढ ही आत्तापर्यंतची ऐतिहासिक वाढ ठरली.(Latest Pune News)
चांदी अनेक उद्योगांसाठी खूप महत्त्वाचा धातू आहे. भारतात चांदीचा दर अनेक गोष्टींवर अवलंबून असतो. सद्यःस्थितीत जागतिक भू-राजकीय तणाव (युद्धे), सुरक्षित गुंतवणूक म्हणून चांदीची मागणी वाढणे, इलेक्ट्रॉनिक्स आणि सौरऊर्जा यांसारख्या उद्योगांमधील मजबूत औद्योगिक मागणी आणि डॉलरच्या किमतीतील घसरण यामुळे चांदीच्या दरात वाढ होत आहे. बुधवारी शहरातील सराफा बाजारात चांदीचा किलोचा दर 1 लाख 60 हजार रुपये होता. गुरुवारी त्यामध्ये तब्बल 12 हजार 380 रुपयांनी वाढ होऊन किलोचा दर 1 लाख 71 हजार रुपयांवर पोहचल्याचे सराफा व्यावसायिकांकडून सांगण्यात आले.
अमेरिकेत शटडाऊनचे सावट आहे. गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणुकीकडे वळत आहेत. फेडरल रिझर्व्ह व्याजदर कमी करू शकते. हेज फंड व ईटीएफ पुन्हा मौल्यवान धातूंमध्ये गुंतवणूक वाढवत आहेत. या सर्व घडामोडींमुळे सोने-चांदीच्या दरात वाढ होत आहे.
जित मेहता, संचालक, पुष्पम ज्वेलर्स
आर्थिक संकटात सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोने-चांदीकडे पाहिले जाते. सध्या बहुतांश देशांकडून चांदीची निर्यात कमी प्रमाणात होत आहे. या सर्वांचा परिणाम चांदीच्या दरावर झाल्याचे दिसून येते. येत्या काळात चांदी 2 लाख रुपये किलोवर जाण्याची शक्यता आहे.
मयूर देवकर, संचालक, देवकर ज्वेलर्स
शहरातील बाजारपेठेतील सोन्या-चांदीचे जीएसटीसह दर पुढीलप्रमाणे
सोने (प्रतितोळा) 8 ऑक्टोबर 9 ऑक्टोबर
24 कॅरेट 1 लाख 25 हजार 860 1 लाख 27 हजार
22 कॅरेट 1 लाख 17 हजार 400 1 लाख 18 हजार 400
21 कॅरेट 1 लाख 14 हजार 800 1 लाख 15 हजार 900
18 कॅरेट 97 हजार 300 98 हजार 300
चांदी (प्रतिकिलो)
8 ऑक्टोबर - 1 लाख 58 हजार 620
9 ऑक्टोबर - 1 लाख 71 हजार