Pune Pub Fire Safety Pudhari
पुणे

Pune Pub Fire Safety: नववर्षाआधी पुण्यातील पब-बारसाठी अग्निशमन दलाचे तातडीचे आदेश

गोवा नाइट क्लब दुर्घटनेनंतर पुणे अग्निशमन दल सतर्क. शहरातील पब, बार, रेस्टॉरंटमध्ये अग्निसुरक्षा, आपत्कालीन मार्ग आणि प्रशिक्षणाची तपासणी सुरू.

पुढारी वृत्तसेवा

पुणे : गोव्यातील नाइट क्लबमध्ये झालेल्या दुर्घटनेत २५ जणांचा मृत्यू झाला. त्या पार्श्वभूमीवर अग्निशमन दलाने शहरातील पब, रेस्टाॅरंट, उपाहारगृहचालकांना सूचना दिल्या आहेत. तसेच, आपत्कालीन उपाययोजनांची तपासणी करण्याचे आदेश अग्निशमन दलाकडून देण्यात आले आहेत.

'गोव्यातील नाइट क्लबमधील दुर्घटना नववर्षाच्या पार्श्वभूमीवर घडली. नाताळपासून पुण्यातही विविध पब, रेस्टाॅरंट, उपाहारगृहांमध्ये गर्दी होण्यास सुरुवात होते. नववर्षापर्यंत ती आणखी वाढते. गोव्यातील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर शहरातील पब, रेस्टाॅरंट, बार, तसेच उपाहारगृहचालकांसाठी आपत्कालीन उपाययोजना, तसेच सुरक्षेसंदर्भात सूचना दलातर्फे देण्यात येणार आहेत.

येत्या दोन दिवसांत विविध सूचनांचे परिपत्रक संबंधितांना पाठविण्यात येईल,' अशी माहिती मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे यांनी दिली.

'शहरातील अनेक पब, रेस्टाॅरंट, बारमध्ये प्रवेश करण्यासाठी, तसेच बाहेर पडण्यासाठी असलेल्या मार्गांची पाहणी करणे गरजेचे आहे. आग किंवा एखादी अनुचित घटना घडल्यास ग्राहकांना त्वरित बाहेर पडण्याचे मार्ग उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. पब, रेस्टाॅरंट, बारमधील अग्निरोधक यंत्रणा कार्यान्वित आहे का नाही, याची पाहणी करणे गरजेचे आहे. एखादी अनुचित घटना घडल्यास त्वरित केल्या जाणाऱ्या उपाययोजनांबाबत पब, रेस्टाॅरंट, बारचालकांनी संबंधित कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे गरजेचे आहे

. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पाेहचेपर्यंत मदतकार्य सुरू करण्याच्या दृष्टीने त्यांना प्रशिक्षित करायला हवे. याबाबत त्यांना आवश्यक ते प्रशिक्षणही अग्निशमन दलाकडून दिले जाईल. आपत्कालीन परिस्थिती ओढवल्यास करावयाच्या उपाययोजनांसंदर्भात सराव करणे गरजेचे आहे. पब, बारमधील कर्मचाऱ्यांची जबाबदारी निश्चित करणेही गरजेचे आहे.' असेही पोटफोडे यांनी नमूद केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT