World War Risk 2026 Pudhari
पुणे

World War Risk 2026: हुकूमशाही वृत्तीमुळे जग महायुद्धाच्या उंबरठ्यावर!

आंतरराष्ट्रीय संघटनांच्या कमकुवत धोरणांमुळे हुकूमशाही वृत्तीला पाठबळ

पुढारी वृत्तसेवा

डॉ. शैलेंद्र देवळाणकर

परराष्ट्र विश्लेषक

पुणे : दुसऱ्या महायुद्धानंतर जगात एक विश्वरचना तयार झाली होती. ज्यामध्ये आंतरराष्ट्रीय संस्था तसेच संघटनांना काही अधिकार देण्यात आले. या संघटनांच्या माध्यमातून विविध देशांच्या महत्त्वाकांक्षांवर नियंत्रण ठेवले जात होते. परंतु, सध्या या संघटना कमकुवत झाल्या आहेत. इतिहास असे सांगतो की, ज्या-ज्या वेळी संघटना कमकुवत आणि राष्ट्रे बलवान होतात. त्या-त्या वेळी हिटलर, मुसोलिनींसारखे हुकूमशहा तयार होतात. या हुकूमशाही वृत्तींमुळेच पुढे महायुद्धे घडतात. आजची जगाची परिस्थिती तशीच निर्माण होताना दिसत आहे.

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू यांनी सर्वात प्रथम इराणचे सर्वेसर्वा खामेनी यांचा मृत्यू झाल्याची बातमी जाहीर केली. त्याला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या प्रशासनाने दुजोरा दिला. मात्र, इराणकडून याबाबत कोणतेही वृत्त दिले जात नव्हते. अखेर रविवारी सकाळी इराणच्या स्टेट न्यूज एजन्सीने इराणचे सर्वोच्च धार्मिक नेते अयातुल्ला खामेनी यांचे निधन झाले असल्याचे स्पष्ट केले. युद्ध सुरू झाल्यानंतरच्या 24 तासांतच हा प्रकार घडलेला आहे.

खामेनींच्या निधनाने इराणमधील एक मोठे पर्व संपले. 1997 मध्ये इराणमध्ये धार्मिक क्रांती झाली. त्यापूर्वी त्याठिकाणी अमेरिकाधार्जिणे रजा शाह पहलवी यांचे शासन होते. त्यांचे शासन उलथवून टाकण्यात आले आणि त्याठिकाणी खामेनी यांची राजवट आली. साधारण तीन दशके इराणमध्ये त्यांचे शासन होते. या काळात इराण पुरस्कृत हमास, हौती आणि हिजबुल्ला या संघटनांच्या माध्यमातून संपूर्ण आखातात अस्थिरता निर्माण केली गेली आणि त्याठिकाणी होणाऱ्या हिंसाचारात या संघटनांचा मोठा सहभाग असल्याचे स्पष्ट झाले. गेली तीन दशके सुरू झालेले हे पर्व अखेर संपले असल्याचे स्पष्ट झाले आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी आठ मिनिटांचा एक व्हिडीओ प्रसारित करत इराणला सक्त ताकीद दिली होती की, एकतर तुम्ही शरणागती पत्करा किंवा मृत्यूसाठी तयार राहा. गेल्या तीन दशकांत पहिल्यांदा असे घडले की, अयातुल्ला खामेनी यांची राजवट अत्यंत कमकुवत झाली होती. यामध्ये गेल्या दोन महिन्यांपासून इराणमध्ये तेथील सत्तेविरोधात लोक रस्त्यावर उतरत विरोध प्रदर्शन करीत होते. इराणवरील आर्थिक निर्बंधांमुळे तेथील अर्थव्यवस्था पूर्ण कोलमडली होती. त्यामुळे त्याठिकाणी सत्तांतर घडवून आणण्याची हीच योग्य वेळ असल्याचे अमेरिका तसेच इस्रायलला माहीत होते. त्यामुळे या दोन्ही देशांनी ही संधी साधल्याचे स्पष्ट झाले आहे.

इराणवर हल्ला करण्यात येणार असून, खामेनी यांची सत्ता जाणार असल्याच्या बातम्या तीन ते चार महिन्यांपासून सातत्याने येत होत्या. याचा अर्थ इराणने युद्धाची कोणतीही तयारी केली नव्हती, असे नाही. त्यामुळे त्यांनी खामेनी यांच्यानंतरच्या नेतृत्वाची तयारी केली आहे. त्यामुळे खामेनी यांच्या मृत्यूनंतर आखातातील युद्ध संपले, असे अजिबात नाही. इराणने जवळपास सात देशांवर हल्ले केले. तसेच, आखातातील एकमेव देश इराण आहे. ज्यांच्याकडे हायपर सॉनिक बॅलेस्टिक मिसाईल्स आहेत. शस्त्रांचा मोठा साठा आहे, अत्याधुनिक ड्रोन्स आहेत. या सगळ्यांचा वापर आता ते आणखी ताकदीने करण्याची शक्यता आहे. त्यामुळे खामेनी यांच्या मृत्यूनंतर संघर्ष संपेल, असे अजिबात नाही.

दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की, 2003 साली अशाच प्रकारे अमेरिकेने इराकवर कारवाई केली होती आणि सद्दाम हुसेन यांना मारले होते. परंतु, त्यानंतर त्याठिकाणी शांतता निर्माण होईल, असे वाटत होते. उलट त्याठिकाणी इसिस, अल कायदा अशा आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनांचे वर्चस्व वाढल्याचे दिसून आले. याचा अमेरिकेला मोठा त्रास झाला. त्यामुळे आखातातील अनुभव असा सांगतो की, एखादा मोठा नेता मारला गेला, तरी त्याठिकाणी शांतता नांदेल, असे चित्र अजिबात दिसत नाही. त्यामुळे इराणचा संघर्ष आता किती काळ चालेल, याबाबत काहीही सांगता येत नाही. तसेच, त्याठिकाणी आता रजा शाह पहलवी यांचे अमेरिका धार्जिणे शासन येऊन शांतता नांदेल, असा दावा करणे अत्यंत चुकीचे ठरणार आहे. त्यामुळे अमेरिकेने ज्याठिकाणी लष्करी कारवाया केल्या त्याठिकाणी पुढील काळात अनेक अडचणी निर्माण झाल्या असल्याचे इराक, अफगाणिस्तान, इराण या देशांच्या माध्यमातून स्पष्ट होत आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेतील काँग्रेस पक्षाची कोणतीही परवानगी न घेता या युद्धात उडी मारली आहे. त्यामुळे त्याठिकाणी ट्रम्प यांच्याबद्दलदेखील तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. जागतिक राजकारणात अत्यंत नकारात्मक प्रवाह निर्माण झाले आहेत. आंतरराष्ट्रीय समुदायात 193 देश आहेत. ते सार्वभौम देश असून, त्यांना संयुक्त राष्ट्र संघटनेने मान्यता दिली आहे. त्या देशाची जनता ठरवेल की, त्या देशाचे नेते कोण असले पाहिजेत. त्यामुळे त्यांच्या देशात कोणाची सत्ता हवी, तो देश कोण चालवेल, हे दुसरे एखादे राष्ट्र कसे ठरवू शकते. परंतु, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हे ठरवायला सुरू केले. त्यांनी इराणमध्ये सत्तांतर घडवून आणण्यास सुरुवात केली, तर मेक्सिको, क्युबा आदी ठिकाणी सत्तांतर घडवून आणण्याची भाषा ते करीत आहेत. हा अत्यंत नकारात्मक प्रवाह आहे.

दुसऱ्या महायुद्धानंतर विविध राष्ट्रांमधील प्रश्न युद्धाच्या मार्गाने न सोडविता चर्चेने सोडविण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघटनेसह अन्य विविध संघटना निर्माण झाल्या. परंतु, एकाही संघटनेत अमेरिकेला जाब विचारण्याचे धाडस नाही. तसेच, संबंधित संघटना डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर नियंत्रण प्रस्थापित करू शकलेल्या नाहीत. यातूनच ही परिस्थिती उद््‌‍भवली आहे. आज आंतरराष्ट्रीय संघटना कमकुवत झाल्या आहेत. युनायटेड नेशन, विश्व व्यापार संघटना, जी-20 आदी संघटना कोणतेही कार्य करताना दिसत नाहीत. त्यामुळे ज्या देशांकडे सामर्थ्य आहे, असे देश छोट्या देशांवर वर्चस्व गाजविण्याचा प्रयत्न करत आहेत. यातूनच एक जीवघेणी शस्त्रास्त्र स्पर्धा निर्माण झाली असून, जग एका मोठ्या हिंसक स्पर्धेकडे जात आहे. जगासाठी हा अत्यंत धोक्याचा इशारा आहे.

त्यामुळे आज इराण झाले उद्या कोणत्या देशाचा नंबर लागेल, हे सांगणे अवघड आहे. अयातुल्ला खामेनी यांची राजवट किती जुलमी होती. त्यांनी किती हिंसाचार केला, किती दहशतवादी संघटनांना खतपाणी घातले हा वेगळा मुद्दा आहे. परंतु, कोणत्या देशात कोणी राज्य करावे, हे तेथील जनतेचा प्रश्न आहे. हे जर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ठरवायला लागले, तर हे अत्यंत चुकीचे असून जागतिक राजकारणात अत्यंत चुकीचा संदेश गेला आहे. त्यामुळे प्रत्येक देश आपले संरक्षण सामर्थ्य वाढविण्याचे प्रयत्न करत आहे. यातून जग एका मोठ्या युद्धाच्या उंबरठ्यावर उभे असल्याचे दिसून येत आहे.

(शब्दांकन : गणेश खळदकर)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT