Global District Agricultural Festival  Pudhari
पुणे

Global District Agricultural Festival 2026: नारायणगाव येथे ‘ग्लोबल जिल्हा कृषी महोत्सव 2026’; 8 ते 11 जानेवारीदरम्यान आयोजन

ड्रोन प्रात्यक्षिके, एआय शेती, धान्य महोत्सव व शेतकरी महिलांसाठी लाखोंची बक्षिसे

पुढारी वृत्तसेवा

नारायणगाव: शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचे ज्ञान, नवतंत्रज्ञानाची माहिती व थेट बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी ग््राामोन्नती मंडळ कृषीविज्ञान केंद्र नारायणगाव येथे 8 ते 11 जानेवारी 2026 दरम्यान ‌‘ग्लोबल जिल्हा कृषी महोत्सव 2026‌’ चे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती कृषी विज्ञान केंद्राचे अध्यक्ष कृषिरत्न अनिल तात्या मेहेर यांनी दिली.

या कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते होणार असून, पीक प्रात्यक्षिकाचे उद्घाटन राज्याचे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते होणार आहे. या महोत्सवासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे, महाराष्ट्र राज्य कृषी आयुक्त सूरज मांढरे, नाबार्डच्या मुख्य महाप्रबंधक रश्मी दरड, महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण परिषदेचे उपाध्यक्ष तुषार पवार, अटारी पुणेचे संचालक डॉ. एस. के. रॉय, जुन्नरचे आमदार शरद सोनवणे व माजी आमदार अतुल बेनके, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रा. दिगंबर दुर्गाडे, विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर, भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे पाटील, ॲड. संजय काळे, आशाताई बुचके आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

कृषीविज्ञान केंद्राच्या 80 एकर प्रक्षेत्रावर आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून पिकवलेला भाजीपाला, फळपिके, संरक्षित शेती, विदेशी भाजीपाला, फुलशेतीतील नवीन जाती, चारापिके, नैसर्गिक शेती, मिलेट उद्यान तसेच परसबागेतील 10 गुंठ्यांत फुलवलेले 40 प्रकारचा भाजीपाला आणि विविध जातींचे कोंबडीपालन, चायना बोकड यांची प्रत्यक्ष पाहणी करण्याची संधी शेतकऱ्यांना मिळणार आहे. या कृषी महोत्सवात धान्य महोत्सव हे विशेष आकर्षण असणार असून, शेतकऱ्यांना थेट बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी, विविध सेंद्रिय डाळी व भरडधान्यांची विक्री केली जाणार आहे. महिला बचत गटांनी तयार केलेले लोणचे, पापड, मसाले, कुरडई, पापड्या, मिलेट्‌‍सचे पदार्थ यांसह शाकाहारी व मांसाहारी खाद्यपदार्थांची चव चाखण्याचीही सुविधा असणार आहे.

या कृषी महोत्सवाला भारतीय कृषी अनुसंधान परिषद, आत्मा कृषी विभाग, नाबार्ड, जिल्हा परिषद, पुणे, भीमाशंकर साखर कारखाना, श्री विघ्नहर साखर कारखाना, कृषी पणन मंडळ, पुणे जिल्हा बँक व बँक ऑफ इंडिया यांचे सहकार्य लाभले आहे.

पीक परिसंवाद व तज्ज्ञांचे मार्गदर्शन

  • 8 जानेवारी, दु. 3 वाजता : ड्रोनद्वारे फवारणीचे प्रात्यक्षिक.

  • 9 जानेवारी, सकाळी 10 वाजता : डॉ. सुनील दिंडे : बदलत्या हवामानातील भाजीपाला पीक व्यवस्थापन.

  • 9 जानेवारी, दु. 2 वाजता : सागर कोपर्डीकर : निर्यातक्षम केळी उत्पादन व एआय तंत्रज्ञान.

  • 10 जानेवारी, सकाळी 10 वाजता : प्रा. विक्रम कड : कृषीप्रक्रिया व मूल्यवर्धनातील संधी.

  • 10 जानेवारी, दुपारी 2 वाजता : डॉ. विवेक भोईटे : ऊस उत्पादन व एआय तंत्रज्ञान.

  • 11 जानेवारी, सकाळी 11 वाजता : प्रगतशील शेतकरी गणेश नानोटे

  • व वर्षा मरकड : नैसर्गिक शेतीतील पंचसूत्री व देशी गोवंश.

शुक्रवारी शेतकरी महिलांसाठी ‌‘खेळ कृषी पैठणीचा‌’

सन 2026 हे जागतिक शेतकरी महिला वर्ष म्हणून जाहीर झाल्याच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी (दि. 9) दुपारी 4 वाजता ‌‘खेळ कृषी पैठणीचा‌’ हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये सहभागी शेतकरी महिलांसाठी लाखोंची बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT