नितीन वाबळे
मुंढवा: घोरपडी येथील साईबाबा मंदिराजवळील रेल्वे उड्डाणपुलाचे काम गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे. पुलाचे काम जवळपास पूर्ण झाले असतानाही तो वाहतुकीसाठी खुला होण्यासाठी आणखी दोन महिन्यांचा कालावधी लागणार असल्याचे प्रशासनाकडून सांगितले जात आहे. यामुळे वाहतूक कोंडीतून सुटका होण्यासाठी अद्यापही प्रतीक्षा करावी लागणार आहे. प्रशासनाकडून ‘तारीख पे तारीख’ दिली जात असल्याने नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे.
गेल्या ऑगस्ट महिन्यात नागरिकांनी पुलाच्या कामाबाबत महापालिका प्रशासनाकडे विचारणा केली होती. त्यावेळी उर्वरित काम दोन महिन्यांत पूर्ण करून ऑक्टोबरमध्ये पूल वाहतुकीसाठी खुला केला जाईल, असे सांगण्यात आले होते. मात्र, ऑक्टोबरमध्ये पुन्हा चौकशी केली असता आणखी दोन महिने लागणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
वारंवार मुदत वाढवली जात असल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या उड्डाणपुलाशेजारील ओढ्यावर नवीन पुलाचे काम सुरू आहे. या कामात उच्चदाब विद्युत वाहिनीचा अडथळा निर्माण झाला होता. सुमारे चार-पाच वर्षांपूर्वी ही वाहिनी टाकतानाच भविष्यात पुलाचे रुंदीकरण होणार असल्याने पुरेसे अंतर ठेवावे, अशी मागणी नागरिकांनी केली होती.
मात्र, त्याकडे दुर्लक्ष झाल्याने आता पुलाच्या कामादरम्यान विद्युत वाहिनी स्थलांतरित करण्यासाठी महापालिकेला बराच वेळ खर्च करावा लागला. त्यामुळे ओढ्यावरील पुलाच्या कामाला विलंब झाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. घोरपडीतील जयहिंद चौक परिसरात सध्या सातत्याने वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे रेल्वे उड्डाणपूल लवकर सुरू झाल्यास या कोंडीतून काही प्रमाणात दिलासा मिळेल, अशी अपेक्षा नागरिकांना आहे. मात्र, काम पूर्ण होण्याच्या तारखा वारंवार बदलत असल्याने नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे.
ओढ्यावरील पुलानंतरच उड्डाणपूल खुला होणार
ओढ्यावरील नवीन पुलाचे काम पूर्ण होण्यापूर्वी रेल्वे उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला केल्यास वाहनांची वर्दळ वाढून सध्या अस्तित्वात असलेल्या ओढ्यावरील अरुंद पुलावर वाहतुकीचा ताण येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या ठिकाणी वाहतुकीची कोंडी निर्माण होऊ शकते. ही परिस्थिती टाळण्यासाठी ओढ्यावरील नवीन पुलाचे काम पूर्ण झाल्यानंतरच रेल्वे उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करण्याचा निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
पुलाचे काम सुरू होऊन दोन वर्षे झाली आहेत. प्रत्येक वेळी काम पूर्ण होण्याची नवी तारीख सांगितली जाते. जयहिंद चौकातील वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाने आता कोणतीही नवीन मुदत न देता काम तातडीने पूर्ण करून पूल वाहतुकीसाठी खुला करावा.शिवाजी पवार, सामाजिक कार्यकर्ते, मुंढवा