fake weapon license Pudhari
पुणे

Ghayaval Gang: घायवळ टोळीतील सरोदेने खोट्या पत्त्यावर घेतला शस्त्र परवाना; एजंटसह गुन्हा

बनावट कागदपत्रांचा आधार देऊन पिस्तूल परवाना मिळवला; सरोदेकडून ४०० काडतुसे जप्त

पुढारी वृत्तसेवा

पुणे: वास्तव्याचा खोटा पत्ता आणि बनावट प्रतिज्ञापत्र सादर करून शस्त्र (पिस्तूल) परवाना मिळवल्याप्रकरणी कुख्यात गँगस्टर नीलेश घायवळ टोळीतील गुंड अजय महादेव सरोदे आणि एका एजंटवर कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, हा प्रकार येरवडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत कल्याणीनगरमध्ये घडला असल्यामुळे संबंधित गुन्हा झीरो नंबरने येरवडा पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात येणार असल्याची माहिती परिमंडळ ३ चे पोलिस उपायुक्त संभाजी कदम यांनी दिली.

अजय सरोदे हा कोथरूड परिसरात राहतो. मात्र, त्याने शस्त्र परवाना अर्जात आपल्या वास्तव्याचा पत्ता कल्याणीनगर येथील टाकल्याचे पोलिस तपासात समोर आले. त्यामुळे त्याच्यावर हा गुन्हा नोंदवल्याचे कदम यांनी सांगितले. तसेच त्याला शस्त्र परवाना मिळवून देण्यासाठी मध्यस्थी करणाऱ्या एका एजंटलाही यामध्ये आरोपी केले आहे.

दरम्यान, नुकतेच सरोदेला अटक केल्यानंतर चौकशीत पोलिसांना त्याच्याकडे गोळीबार केलेल्‍या पुंगळ्यांसह ४०० काडतुसे सापडली आहेत. त्यात २०० रिकाम्या पुंगळ्या व २०० जिवंत काडतुसे आहेत. त्‍याने पिस्‍तुलातून गोळ्या झाडण्याचा सराव लोणावळा येथील शेतात केला. त्‍यानंतर त्‍याने घायवळला काडतुसे दिल्‍यानंतर घायवळने अहिल्‍यानगर येथील सोनई गावच्‍या शेतात गोळ्या झाडण्याचा सराव केल्‍याचे पुढे आले होते.

सप्टेंबर महिन्यात झालेल्या कोथरूड गोळीबार प्रकारानंतर एका तरुणावर धारदार शस्त्राने वार करून खुनाचा प्रयत्‍न केला होता. या प्रकरणात सरोदेला अटक केली असून, कुख्यात गुंड नीलेश घायवळच्या गुंडांनी १७ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री एका तरुणावर गोळीबार केला होता. त्यानंतर २० मिनिटांच्या अंतराने त्यांनी एका तरुणावर कोयत्याने वार करत खुनाचा प्रयत्न केला. या दोन्ही प्रकरणात स्वतंत्र गुन्हे दाखल केले असून, याप्रकरणी घायवळ आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध मकोकाअंतर्गत कारवाई केली आहे.

शस्त्र परवाना घेताना सरोदे याने आपल्या वास्तव्याचा पत्ता खोटा दिला. तसेच त्याने बनावट कागदपत्रे सादर केली. चौकशीत हा प्रकार निष्पन्न झाल्यामुळे सरोदेसह दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यामध्ये एका एजंटचादेखील समावेश आहे.
संभाजी कदम, पोलिस उपायुक्त परिमंडळ तीन

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT