

Pune Extortion Case
पुणे: चण्याचा मर्डर करेन, चण्याचे तुकडे तुकडे करेन, या चण्याला सोडणार नाही, 50 लाख दे, मग तुला सोडतो, अशी धमकी दिल्याप्रकरणी चौघांवर सिंहगड रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सचिन हनुमंत देवगिरीकर, किरण हनुमंत देवगिरीकर, अमित विष्णू दिघे आणि मंदार मण्यारे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत संभाजी भिकाजी देवगिरीकर ऊर्फ चण्या (वय 39, रा. वडगाव बुद्रुक) यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार संदीप दवगिरीकर यांचा गाड्या खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. त्यावरच त्यांचा उदरनिर्वाह चालतो. दि. 1 डिसेंबर रोजी सायंकाळी सव्वाचार वाजता ते वडगाव बुद्रुक येथील शिवाजीराव गायकवाड यांच्या इमारतीनजीकच्या सद्गुरू कृपा इमारतीजवळ थांबले होते.
त्या वेळी त्यांच्या ओळखीचा सचिन दवगिरीकर व त्याच्यासोबत किरण दवगिरीकर, अमित दिघे व मंदार मण्यारे तेथे आले. त्यापैकी सचिन दवगिरीकर याने संदीप यांना विनाकारण शिवीगाळ करणे सुरू केले. त्याला तक्रारदारांनी शिवीगाळ करू नको, असे म्हटले असता त्याने तक्रारदारांना चापट व बुक्या मारल्या.
त्यानंतर चण्याचा मर्डर करेन, चण्याचे तुकडे तुकडे करेन, या चण्याला सोडणार नाही, 50 लाख दे, मग तुला सोडतो, अशी धमकी दिली. या वेळी रस्त्याने येणारे-जाणारे लोक जमा झाले. त्यापैकी काही लोकांनी हे भांडण सोडविले. पुढील तपास सिंहगड रोड पोलिस करीत आहेत.