

पुणेः एक उच्चशिक्षित चोरट्याला विमानतळ पोलिसांनी अटक केली आहे. सराफी दुकानात खरेदीचा बहाणा करून बनावट अंगठी ठेवत दुकानातील सोन्याची अंगठी चोरण्याची त्याची पद्धत अखेर सीसीटीव्हीच्या मदतीने पोलिसांच्या हाती लागली. सैफ दिलीप बेळगावकर (वय २९, रा. केदारेनगर, वानवडी, मूळ रा. सांगली) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे.
बेळगावकर हा उच्चशिक्षित असून, पूर्वी आयटी कंपनीत नोकरीला होता. सध्या तो हॉटेल व्यवसायात आहे. आर्थिक स्थिती चांगली असूनही तो चोरीकडे वळला. त्याने अशा पद्धतीने आणखी काही सराफी व्यावसायिकांना गंडा घातला असून, त्यादृष्टीने तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. याबाबत २१ वर्षीय तरुणाने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. २३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजता विमाननगर येथील नामांकित ज्वेलर्समध्ये ही घटना घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी २६ नोव्हेंबर रोजी दुकानात काम करत असताना एक रिंग बनावट असल्याचे मॅनेजर यांनी निदर्शनास आणून दिले. त्यानंतर सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले, असता २३ नोव्हेंबरला एक तरुण पांढरी हुडी व काळी पँट घालून दुकानात येताना दिसला.
रिंग पाहताना तो फोनवर बोलत असल्याचे भासवत ट्रेमधील ८ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी चोरून तिथे स्वतःजवळील खोटी अंगठी ठेवून गेल्याचे दिसून आले. याबाबत गुन्हा दाखल होताच विमानतळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक गोविंद जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक नितीन राठोड यांच्या पथकाने सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीचा माग काढला. त्यादरम्यान औंधमधील एका सराफी दुकानात तो येणार असल्याची माहिती पथकाला मिळाली.
त्यावेळी सापळा रचून पथकाने बेळगावकर याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या तपासात त्याने गुन्ह्याची कबुली दिली. परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त सोमय मुंडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोविंद जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक नितीन राठोड, मनोज बरुरे, अंमलदार योगेश थोपटे, ज्ञानेश्वर आवारी, रूपेश पिसाळ, शैलेश नाईक, दादासाहेब बर्डे, हरिप्रसाद पुंडे यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.