फुरसुंगी : संपूर्ण जिल्ह्यासाठी उत्सुकतेची व प्रथमच झालेल्या फुरसुंगी उरुळी देवाची सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) नगराध्यक्ष पदासह ३२ पैकी १९ जागा जिंकत फुरसुंगी नगरपरिषद आपला झेंडा फडकवला आहे.
तसेच राष्ट्रवादीने महायुती (शिवसेना शिंदे गट व भाजप) व महाविकास आघाडीला धोबीपछाड देत नगर परिषदेवर सत्ता काबीज केली आहे. या निवडणुकीत शिवसेनेला (शिंदे गट) ८ तर भाजपाला ५ जागांवर समाधान मानावे लागले. महाविकास आघाडीचा येथील निवडणुकीत दारुण पराभव झाला असून, त्यांना एकाही जागेवर आपले खाते उघडता आले नाही.
फुरसुंगीतील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये रविवारी सकाळी मतमोजणीला सुरुवात झाली. सुरुवातीच्या काही फेऱ्यानंतरच लढतीचे चित्र स्पष्ट झाले, काही उमेदवारांनी सुरुवातीपासून घेतलेली आघाडी शेवटपर्यंत टिकून धरल्यामुळे त्यांचा विजय झाला. उरुळी देवाची गावातील प्रभाग क्रमांक १५ व १६ या ठिकाणी जास्त मतदान असल्यामुळे या ठिकाणच्या मतमोजणीचा निकाल येण्यास थोडा वेळ लागला. दुपारी दीड वाजेपर्यंत सर्व जागांवरील निकाल हाती आले होते.
या निवडणुकीत प्रामुख्याने तिरंगी लढत पाहायला मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार), भाजप व शिवसेना शिंदे गट यांची महायुती व महाविकास आघाडी यांच्यात प्रामुख्याने या ठिकाणी लढती पाहायला मिळाल्या. काही प्रभागात भाजप व शिंदे गटात मैत्रीपूर्ण लढती झाल्या. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संतोष सरोदे यांनी सुरुवातीपासूनच आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर आघाडी घेत शेवटच्या फेरीअखेर ते २८९८ मतांनी ते विजयी झाले. त्यांना एकूण मतदान २०,९०८ झाले. दुसऱ्या क्रमांकावरील महायुतीचे उमेदवार महेंद्र सरोदे यांना १८०१० तर महाविकास आघाडीचे संतोष कांबळे यांना ६०५५ मते पडली. येथील नगराध्यक्ष पद अनुसूचित जातीसाठी राखीव आहे.
कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये यासाठी फुरसुंगी पोलिसांनी मतमोजणीच्या ठिकाणी व परिसरात मोठा बंदोबस्त ठेवला होता. वरिष्ठ पोलिस अधिकारी याठिकाणी तळ ठोकून होते.
गोंधळाचे वातावरण
मतमोजणीसाठी आत सोडताना काही उमेदवारांना व त्यांच्या प्रतिनिधींना यादीत नाव नसल्याच्या कारणातून अडवल्यामुळे प्रवेशद्वारापाशी काही काळ गोंधळाचे वातावरण तयार झाले होते. मात्र पोलिसांनी थोड्या वेळाने त्यांना आत सोडल्यानंतर येथील परिस्थिती पूर्ववत झाली.
या निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवारांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता. पराभव होत असल्याचे दिसताच काही उमेदवारांनी मतमोजणीच्या ठिकाणाहून काढता पाय काढला. काही उमेदवारांच्या चेहऱ्यावर पराभवाचे दुःख दिसून येत होते. विजयी उमेदवारांनी फटाक्यांची आतिषबाजी, गुलालाची उधळण करत आपापल्या प्रभागातून वाहनातून रॅली काढत जल्लोष केला.
सर्वाधिक व सर्वात कमी मताने विजय
शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी बाळासाहेब हरपळे यांची पत्नी राणी हरपळे यांनी १४६९ मतांच्या फरकाने विजय नोंदवत या निवडणुकीत सर्वाधिक मतांनी विजयी होण्याचा मान पटकावला. भाजपचे माजी तालुकाध्यक्ष धनंजय कामठे यांच्या पत्नी अमृता कामठे यांनी त्यांच्या विरोधकांचा अवघ्या २६ पराभव करत संघर्षपूर्ण विजय मिळविला.
निकाल वैशिष्ट्य-दिग्गज पराभव
शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे माजी उपशहर प्रमुख व नुकताच राष्ट्रवादीत (अजित पवार) प्रवेश केलेले अमोल हरपळे, फुरसुंगीचे माजी उपसरपंच प्रवीण हरपळे, भाजपचे माजी तालुकाध्यक्ष संदीप हरपळे, शिवसेनेचे (शिंदे गट) माजी पंचायत समिती सदस्य राजीव भाडळे व शिवसेना (उबाठा) गटाचे जिल्हाप्रमुख उल्हास शेवाळे यांचा या निवडणुकीत पराभव झाला
निकाल वैशिष्ट्य- दिग्गज विजय
पुणे महापालिकेचे माजी नगरसेवक गणेश ढोरे, फुरसुंगीच्या माजी उपसरपंच सुधा संजय हरपळे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रशांत भाडळे यांचा विजय झाला.
आजी-माजी लोकप्रतिनिधींचा प्रयोग फसला?
फुरसुंगी उरुळी देवाची नगरपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने प्रथमच एकत्र आलेले एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक विद्यमान आमदार विजय शिवतारे व माजी आमदार संजय जगताप यांनी एकत्र येत महायुतीचा प्रचार केला होता. मात्र त्यांच्या महायुतीला फक्त १३ जागांवर समाधान मानावे लागले. त्यामुळे या दोन्ही लोकप्रतिनिधींचा महायुतीचा फुरसुंगी उरुळी देवाची नगर परिषदेवर झेंडा फडकवण्याचे स्वप्न भंगले आहे.
प्रभागनिहाय विजयी उमेदवार, दुसऱ्या क्रमांकावरील उमेदवार, पक्ष व त्यांची मते
प्रभाग १अ-
गिरीश ढोरे (राकॉं)- १२९२ विजयी विरुद्ध ॲड. विराज करचे (भाजप)-७९२
प्रभाग १ब-
स्नेहा सचिन हरपळे (राकॉं)-१४५१ विजयी विरुद्ध प्रियंका वैभव हरपळे (भाजप)-७२६
प्रभाग २अ-
उषा कैलास ढोरे (राकॉं)-१४१० विजयी विरुद्ध ज्योती पंडित बदूरकर (भाजप)-३९२
प्रभाग २ब-
सचिन हरपळे (राकॉं)- १३०१ विजयी विरुद्ध सचिन काळे (भाजप)-५०४
प्रभाग ३अ-
स्नेहल रामचंद्र जवंजाळ (राकॉं)-१०७९ विजयी विरुद्ध उत्प्रेक्षा भूपेंद्र बेंगळे (भाजप)-४१४
प्रभाग ३ब-
सचिन देवकाते (राकॉं)-१२६३ विजयी विरुद्ध राहुल पवार (शिवसेना)-५५४
प्रभाग ४ अ- संभाजी रोकडे (राकॉं)-७३३ विजयी विरुद्ध सचिन गायकवाड (शिवसेना)-७०३
प्रभाग ४ब-
विशाखा संदीप हरपळे (शिवसेना)-१५१७ विजयी विरुद्ध स्नेहल योगेश कामठे (राकॉं)-९५६
प्रभाग ५ अ-
स्वाती लक्ष्मण आढाळे (राकॉं)-१४३३ विजयी विरुद्ध संगीता गोविंद सूर्यवंशी (भाजप)-८६८
प्रभाग ५ब-
ओंकार कामठे (राकॉं)-१४१२ विजयी विरुद्ध राहुल कामठे (भाजप)-९०१
प्रभाग ६अ-
महेश हरपळे (शिवसेना)-१६०२ विजयी विरुद्ध विशाल हरपळे (शिवसेना-ठाकरे)-१३४४
प्रभाग ६ब-
अमृता धनंजय कामठे (भाजप)-१०८४ विजयी विरुद्ध गौरी गणेश हरपळे (शिवसेना)- १०५८
प्रभाग ७अ-
संतोष आबनावे (शिवसेना)-१७७४ विजयी विरुद्ध निखिल सरोदे (राकॉं)- ९५४
प्रभाग ७ब-
राणी बाळासाहेब हरपळे (शिवसेना)-२२९७ विजयी विरुद्ध कांचन प्रशांत हरपळे (राकॉं)- ८२८
प्रभाग८अ-
मोनिका नीलेश पवार (शिवसेना)- १६४३ विजयी विरुद्ध पल्लवी शरद हरपळे (राकॉं)- १४०९
प्रभाग ८ब-
गणेश कामठे (शिवसेना)- १७३६ विजयी विरुद्ध प्रवीण हरपळे (राकॉं)- १२०२
प्रभाग ९अ-
सुधा संजय हरपळे (भाजप)-११८७ विजयी विरुद्ध उज्वला सूर्यकांत गिरी गोसावी (राकॉं)- ९६०
प्रभाग ९ब-
गणेश ढोरे (राकॉं)- ११०३ विजयी विरुद्ध संदीप हरपळे (भाजप)- ९९१
प्रभाग १०अ-
सुकन्या प्रकाश शेवाळे (राकॉं)-९४४ विजयी विरुद्ध सुधा संजय हरपळे (भाजप)- ६४६
प्रभाग १०ब
अमित हरपळे (राकॉं)- ९२८ विजयी विरुद्ध संदीप हरपळे (शिवसेना)- ६७९
प्रभाग ११अ-
उषा नरसिंग ढमाळ (शिवसेना)-१७७८ विजयी विरुद्ध प्राची चंद्रकांत ढमाळ (राकॉं)- १५४८
प्रभाग ११ब-
अजिंक्य ढमाळ (राकॉं)- १६३८ विजयी विरुद्ध योगेश कुंजीर (शिवसेना)-१३५५
प्रभाग १२अ-
ॲड. अमोल कापरे (राकॉं)-१२१७ विजयी विरुद्ध महेश मोहिते (शिवसेना)- ४९७
प्रभाग १२ब-
प्राची देशमुख (राकॉं)-१७८९ विजयी विरुद्ध प्रतीक्षा महेंद्र बाजारे (शिवसेना)-५३३
प्रभाग १३अ-
चंद्रकांत ढमाळ (राकॉं)-११२५ विजयी विरुद्ध ऋतुराज खुटवड (भाजप)-९६०
प्रभाग १३ब-
भावना अजिंक्य ढमाळ (राकॉं)-१७३२ विजयी विरुद्ध सविता राजू ढवळे (शिवसेना)-७९४
प्रभाग १४अ-
शीतल अमित हरपळे (राकॉं)-१२३३ विजयी विरुद्ध डॉ. उज्वला बाळासाहेब हरपळे (भाजप)- ७५५
प्रभाग १४ब
संतोष हरपळे (भाजप)-१५४३ विजयी विरुद्ध दत्तात्रय राऊत (राकॉं)-६१३
प्रभाग १५अ-
शारदा भैरू भाडळे (शिवसेना)-२२१८ विजयी विरुद्ध सुषमा तात्या भाडळे (राकॉं)-१९७९
प्रभाग १५ब-
प्रशांत भाडळे (राकॉं)-२३४४ विजयी विरुद्ध राजीव भाडळे (शिवसेना)-२१४१
प्रभाग १६अ-
पल्लवी गोरख आबनावे (भाजप)-२२०७ विजयी विरुद्ध पूनम संदेश बहुले (शिवसेना-ठाकरे)-१४६६
प्रभाग १६ ब-
विकास भाडळे (भाजप)-१९३४ विजयी विरुद्ध उल्हास शेवाळे (शिवसेना-ठाकरे)-१७१५