Marathi Dialect: मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त विद्यापीठात ‘बोलींचा जागर’ उपक्रम
पुणे : मराठीतील विविध बोलींचे जतन व संवर्धन करण्याच्या उद्देशाने राज्य शासनाच्या भाषा संचालनालयामार्फत जानेवारी महिन्यात साजऱ्या होणाऱ्या मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याअंतर्गत राज्यातील ३६ जिल्ह्यांत 'बोलींचा जागर' हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्यासंदर्भात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागात बोली अभ्यासक व तज्ज्ञांची बैठक आयोजित करण्यात आली होती.
बोली भाषा नष्ट होण्यामागील कारणांचा शोध घेऊन त्यावर उपाययोजना करणे, विविध उपक्रम, कार्यक्रम, सर्वेक्षण व संकलनाच्या माध्यमातून बोलींचे जतन करणे, तसेच बोलींच्या अभ्यासासाठी शैक्षणिक आणि सामाजिक पातळीवर काम करणे, हा या बैठकीचा मुख्य उद्देश होता. 'बोलींचा जागर' हा उपक्रम विद्यापीठ स्तर, बोली अभ्यासक कार्यशाळा आणि प्रत्यक्ष कार्यक्षेत्र अशा तीन टप्प्यांत राबविण्याचे नियोजन असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
कार्यशाळेचे प्रमुख मार्गदर्शक व भाषा संचालनालयाचे भाषा संचालक अरुण गीते यांनी तालुका स्तरावर, शिक्षण संस्था व महाविद्यालयांमध्ये बोली तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली किमान तीन तासांचे कार्यक्रम राबवावेत, असे मत व्यक्त केले. बोली म्हणजे केवळ भाषा नसून ती त्या प्रदेशाची संस्कृती, जीवनशैली व लोकस्मृतीचे प्रतिबिंब असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. या वेळी १३ बोली अभ्यासकांनी महाराष्ट्रातील विविध प्रदेशांतील बोली, त्या-त्या भागातील संस्कृती, भाषेची लय, शब्दसंपदा, लोकगीते, म्हणी, उखाणे यांसारख्या महत्त्वपूर्ण घटकांवर आपले विचार मांडले.
डॉ. सोनल कुलकर्णी यांनी बहुभाषिकतेचे महत्त्व आणि बोलींच्या शास्त्रीय संकलनाची आवश्यकता अधोरेखित केली. डॉ. केशव देशमुख यांनी तरुण साहित्यिकांनी बोलींमधून वाङ्मय निर्मिती करावी तसेच शेतकरी, महिला व सामान्य माणसांच्या बोलींवर संमेलने घ्यावीत, असे मत व्यक्त केले. यावेळी डॉ. बाळकृष्ण लळीत, रेश्मा लवटे, रतन कांबळे, स्वाती सोनावळे, डॉ. सुशील धसकटे, डॉ. मारुती आढळ, डॉ. विजय कांबळे, डॉ. सुनील घनकुटे, रामदास वाघमारे, तुषार पाटील, डॉ. दिलीप कसबे या बोलीभाषा अभ्यासाकांनी विविध बोलींसंदर्भात आपली भूमिका मांडली.

