मराठा विद्यार्थ्यांना मोफत टायपिंग प्रशिक्षण Pudhari
पुणे

Sarathi free typing course: मराठा विद्यार्थ्यांना मोफत टायपिंग प्रशिक्षण

राज्य परीक्षा परीषदेचा सारथी संस्थेला अर्थसहाय्यासाठी प्रस्ताव; मराठा, कुणबी, कुणबी-मराठा व मराठा-कुणबी या प्रवर्गांतील विद्यार्थ्यांना होणार फायदा

पुढारी वृत्तसेवा

पुणे : ‌‘छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था‌’ अर्थात ‌‘सारथी‌’ या संस्थेकडून शासकीय संगणक टंकलेखन बेसिक कोर्स प्रमाणपत्र परीक्षा व संगणक लघुलेखन परीक्षा उत्तीर्ण करणाऱ्या मराठा, कुणबी, कुणबी-मराठा व मराठा-कुणबी या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य मिळण्यासाठी राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर संबंधित प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शुल्कप्रतीपूर्ती मिळणार असून, मोफत टायपिंग प्रशिक्षण मिळणार असल्याचे राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. (Latest Pune News)

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्य परीक्षा परिषद दरवर्षी दोन वेळा शासकीय संगणक टंकलेखन बेसिक कोर्स प्रमाणपत्र परीक्षा, संगणक टंकलेखन पुनर्परीक्षा व संगणक लघुलेखन परीक्षा आयोजित करत असते. या परीक्षेला बसणाऱ्या मराठा, कुणबी, कुणबी-मराठा व मराठा-कुणबी या लक्षीत गटातील विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना आर्थिक साह्य प्राप्त झाल्यास त्याना व्यवसायाच्या व नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध होतील.

राज्यभरातून तीन हजारांहून अधिक टंकलेखन संस्थांच्या माध्यमातून वर्षाला किमान 3 ते 4 लाख परीक्षार्थी संबंधित परीक्षांना प्रवेशित होत असतात. यामध्ये खुला (मराठासह) प्रवर्ग, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या जमाती व विमुक्त जाती, इतर मागासवर्ग अशा सर्व प्रवर्गातील दहावी उत्तीर्ण असलेले परीक्षार्थी दरवर्षी परीक्षा देत असतात. या परीक्षार्थींना संगणक टायपिंग मराठी, हिंदीसह 16 विविध विषयांची परीक्षा देण्याची संधी मिळते. परीक्षार्थ्यांचे बहुतांश पालक आर्थिकदृष्ट्‌‍या सक्षम नसतानादेखील केवळ स्वयंरोजगारासाठी किंवा नोकरी मिळविण्याकरिता, ते आपल्या पाल्यांना टायपिंगच्या व लघुलेखनाच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेशित करतात. त्यामुळे ‌’सारथी‌’च्या वतीने विद्यार्थ्यांना शुल्क अनुदान स्वरूपात मिळाल्यास त्यांना हा व्यावसायिक अभ्यासक्रम विनासायास शिकणे शक्य होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

‌‘अमृत‌’ या संस्थेमार्फत मिळतोय लाभ

संगणक टंकलेखन व लघुलेखन परीक्षेतील राज्यभरातील सर्व आर्थिकदृष्ट्‌‍या मागासलेल्या प्रवर्गातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी म्हणजेच ‌‘अमृत‌’ या संस्थेमार्फत जून, 2024 संगणक टंकलेखन परीक्षेपासून प्रशिक्षण शुल्काचा परतावा मिळत आहे. या संस्थेसोबत परीक्षा परिषदेचा करारनामा देखील झालेला आहे. या करारनाम्याची प्रत

राज्य परीक्षा परिषदेने सारथी संस्थेला दिली असून, याच करारनाम्याचा आधार घेऊन सारथी संस्थेसोबतदेखील करारनामा करता येणार असल्याचे परीक्षा परिषदेने स्पष्ट केले आहे.

अनुदान मंजूर केल्यास जास्तीत जास्त परीक्षार्थींना लाभ

संगणक टंकलेखन परीक्षेसाठी प्रति परीक्षार्थी प्रतिविषय साडेसहा हजार शुल्क घेतले जाते. संगणक लघुलेखन परीक्षेसाठी प्रति परीक्षार्थी प्रति विषय 5 हजार 300 रुपये शुल्क घेतले जाते. तरी संबंधित परीक्षार्थींना जास्त विषयांसाठी अनुदान दिले जावे, अशी राज्य परीक्षा परिषदेच्या मागणी आहे.

सारथी संस्थेला पाठविण्यात आला आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर उत्तीर्ण विद्यार्थ्यांना शुल्कप्रतीपूर्ती देण्यात येईल. त्यामुळे संबंधित विद्यार्थ्यांना एक प्रकारे मोफतच प्रशिक्षण मिळणार आहे. याचा लाभ राज्यातील मराठा, कुणबी, कुणबी-मराठा व मराठा-कुणबी या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना होणार आहे. त्यासाठी सारथी संस्थेने प्रस्तावाला तत्काळ मंजुरी देणे गरजेचे आहे.
डॉ. नंदकुमार बेडसे, अध्यक्ष, राज्य परीक्षा परीषद

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT