

चाकण : तळेगाव ते उरुळी कांचन दरम्यान प्रस्तावित रेल्वे मार्गाचा डीपीआर तयार करण्यात आला असून, या मार्गामुळे होणाऱ्या जमिनीच्या संपादनाला स्थानिक शेतकऱ्यांचा तीव्र विरोध होत आहे. हजारो कुटुंबे उद्ध्वस्त करणाऱ्या या प्रकल्पास पुढील काळात टोकाचा विरोध होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. या प्रकल्पामुळे होणाऱ्या संभाव्य नुकसानीमुळे रेल्वे मार्ग त्वरित रद्द करण्याची मागणी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्याकडे निवेदनाद्वारेे करण्यात आली आहे.(Latest Pune News)
कुरुळी (ता. खेड) येथील ग्रामस्थांनी मंत्री आठवले यांची शुक्रवारी (दि. 3) भेट घेतली. मंत्री आठवले यांनी या भागातील जनतेवर अन्याय होऊ देणार नसल्याची ग्वाही दिली. हा प्रस्तावित रेल्वे मार्ग तळेगाव ते सांगुर्डी, तळवडे, निघोजे मार्गे कुरुळी व उरुळी कांचन येथे जातो. या सर्व गावांमधील शेतकरी या मार्गामुळे बाधित होणार असून, त्यांच्या जमिनी, घरे, वडिलोपार्जित व्यवसाय आणि पर्यावरण यावर गंभीर परिणाम होणार आहे.
स्थानिक नागरिकांशी कोणताही थेट संवाद न साधता प्रकल्प ठरवले जात आहेत, जे निषेधार्ह आहे. त्यामुळे हा प्रकल्प रद्द करून पर्यायी मार्ग शोधण्यात यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. हवालदिल झालेले स्थानिक नागरिक दररोज नेत्यांच्या दारात जाऊन विनंती करत आहेत; मात्र तरीही शासनाने जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केल्यास कित्येक पिढ्या तसेच या भागात वास्तव्य करणारी जनता मोठा विरोध करणार असल्याचे स्पष्ट चित्र या भागात पाहायला मिळत आहे.
मंत्री आठवले यांनी स्थानिकांचा भावना रेल्वे प्रशासनाच्या पुणे विभागाच्या अधिकार्यांना तत्काळ फोन व पत्राद्वारे कळविल्या आहेत.
शासनाने पुनर्विचार करावा : आ. बाबाजी काळे
तळेगाव ते उरुळी कांचन रेल्वे मार्गाला खेड तालुक्यातील स्थानिकांचा तीव विरोध होत आहे. त्यामुळे नागरिकांचा प्रचंड विरोध असताना असा प्रकल्प करणे संयुक्तिक होणार नाही. त्यामुळे शासनाने या रेल्वे प्रकल्पाबाबत पुर्नविचार करावा, अशी मागणी खेडचे आमदार बाबाजी काळे यांनी केली आहे.
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना निवेदन देताना कुरुळी ग्रामस्थ. (छाया : अविनाश दुधवडे)