

सारोळा : कासुर्डी गु.मा. (ता. भोर) हद्दीतील डांबर प्लांटच्या काळ्या धुराच्या व त्याच्या वासाच्या त्रासामुळे ग्रामस्थांनी प्रांताधिकारी डॉ. विकास खरात व तहसीलदार राजेंद्र नजन यांच्याकडे अर्ज करून हा प्लांट तत्काळ बंद करावा अन्यथा जनअंदोलन छेडणार असल्याचा इशारा दिला.(Latest Pune News)
कासुर्डी (गु.मा.) येथील एमडी एन्फा कंपनीने पुणे-सातारा महामार्गाच्या दुरूस्ती कामासाठी लागणाऱ्या डांबरीकरणासाठी येथे प्लांट उभारला आहे. याबाबत प्रदुषण महामंडळाची व इतर कोणतीही शासकीय परवानगी न घेता हा डांबर प्लांट सुरू केला आहे. गावापासून अवघ्या 300 मीटर व वनविभाग क्षेत्रापासून 200 मीटरवर हा डांबर प्लांट आहे. डांबर प्लांट सुरू करताच काळ्या धुराचे झोळ व डांबराचा उग्रवास येथील परिसरात पसरतो. या त्रासाच्या विरोधात ग्रामस्थांनी एकत्रीत येऊन प्रांताधिकारी व तहसीलदार यांना अर्ज केला आहे
एमडी एन्फा. कंपनीचा डांबर मिक्सिंग प्लांट शासकीय परवानगीशिवाय ग्रामपंचायतीच्या ना-हरकत दाखल्यावर सुरू आहे. यातून ग्रामस्थांच्या आरोग्याशी खेळले जात आहे. हा प्लांट बंद न झाल्यास जनआंदोलन छेडणार.
परशुराम मालुसरे, प्रगतशील शेतकरी
अवैध डांबर प्लांट सुरू करणाऱ्या या मालकास वाचविण्याचा प्रयत्न सुरू आहे. जल-वायू प्रदूषण महामंडळ व संबंधित अधिकारीवर्ग यांनी तातडीने कारवाई करावी.
शंकर मालुसरे, माजी संचालक, राजगड कारखाना