

पुणे : पिंपरीतील लिफ्ट अपघात ही तांत्रिक समस्या असल्याचे प्रथमदर्शनीत घडलेली चूक दिसत असली तरी यामागे मानवी चुका देखील आहेत. त्यामुळे शहरातील सर्वच सोसायट्यांच्या पदाधिकाऱ्यांनी लिफ्टचे मेन्टनन्स वेळेत आणि अधिकृत व्यक्तीकडूनच करावे, असे आवाहन लिफ्ट अभ्यासक आणि तज्ज्ञांनी सोसायट्यांच्या पदाधिकाऱ्यांना केले आहे. याशिवाय पालकांनी चिमुकल्यांना लिफ्टपासून लांबच ठेवावे, असेही त्यांनी दै. ‘पुढारी’च्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.(Latest Pune News)
दसऱ्याच्या दिवशी पिंपरी-चिंचवडमधील चोविसावाडी
येथील रामस्मृती हाऊसिंग सोसायटीमध्ये 11 वर्षीय चिमुकल्याचा लिफ्टमध्ये अडकून मृत्यू झाला. त्या घटनेच्या पार्श्वभूमीवर हा अपघात नक्की कशामुळे झाला असेल, त्याची तांत्रिक कारणे काय, असे अपघात टाळण्यासाठी काय काळजी घेणे महत्त्वाचे आहे, यासंदर्भात दै. ‘पुढारी’च्या प्रतिनिधीने शनिवारी (दि. 4)लिफ्ट तज्ज्ञ, अभ्यासक आणि पालकांशी संवाद साधला.
त्यावेळी त्यांनी सोसायट्यांमधील लिफ्टचे मेन्टनन्स वेळेत आणि अधिकृत व्यक्तीकडूनच करून घ्यावे, असे आवाहन केले. याचबरोबर पालकांनी मुलांना एकट्याला लिफ्टचा वापर करू देऊ नये, त्याच्या सोबत जावे, असेही सांगितले.
पालकांनी घ्यावी ही काळजी...
मुलांना लिफ्टमध्ये कधीही एकटे पाठवू नका. लिफ्टमध्ये काही बिघाड झाल्यास किंवा मुले आत अडकल्यास त्यांना मदत करण्यासाठी कुणीतरी मोठा माणूस सोबत असणे आवश्यक आहे. लहान मुले लिफ्टमध्ये एकटी असताना घाबरू शकतात.
मुलांना सांगा की, लिफ्टचा दरवाजा उघडताना किंवा बंद होताना त्यापासून दूर थांबावे. अनेक अपघात दरवाजे बंद होत असताना होतात. तसेच, त्यांना दरवाज्यामध्ये हात किंवा पाय घालण्यापासून रोखा.
मुलांना लिफ्टच्या बटणांशी खेळण्यापासून थांबवा. अनेकदा मुले लिफ्टच्या आत बटणे दाबतात. त्यामुळे लिफ्टचा वेग वाढू शकतो किंवा ती मध्येच थांबून अडचण निर्माण होऊ शकते.
जर तुम्ही लहान मुलांसोबत असाल, तर लिफ्टमध्ये असताना त्यांना घट्ट हातात धरून ठेवा किंवा उचलून घ्या. गर्दीच्या वेळी किंवा लिफ्ट वेगाने वर-खाली होताना मुले पडू शकतात. मुलांना लिफ्टमधील इमर्जन्सी बटण आणि अलार्म बटण याबद्दल माहिती द्या. त्यांना सांगा की काही अडचण आल्यास हे बटण दाबून मदतीसाठी बोलावता येते.
या घटनेतील चुकी तंत्रज्ञानाची असल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट होत आहे, त्यामुळे या घटनेची कडक चौकशी व्हायला हवी. त्यासोबतच हे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडे (पीडब्ल्यूडी) आहे. त्यांनीही शहरातील सर्व सोसायट्यांमधील लिफ्टची तपासणी करून दर तीन महिन्यांनी याचा अहवाल जिल्हाधिकारी, महापालिका, पोलिस आयुक्तांना सादर करावा. विशेष सरकारी अधिकाऱ्यांची नेमणूक करून सोसायट्यांच्या सुरक्षा नियमांची कडक तपासणी व्हावी. तसेच, अशा घटना पुन्हा घडू नयेत, याकरिता सोसायट्यांच्या पदाधिकाऱ्यांनाही जबाबदार धरून, त्यांच्यावरसुद्धा कडक कारवाई व्हावी.
संजय शितोळे, अभ्यासक
लिफ्टमध्ये असा अपघात होणे हे शक्य नाही. लिफ्टला 20 ते 25 पट सेफ्टी सुरक्षा असते. या घटनेतील लिफ्टची योग्य देखभाल दुरुस्ती (प्रॉपर मेन्टनन्स) झाली नसेल किंवा अल्पशिक्षित व्यक्तीकडून सोसायटीने देखभाल दुरुस्ती करून घेतली असण्याची शक्यता आहे.
अरविंद जगदाळे, इंजिनिअर आणि लिफ्टसंदर्भातील अभ्यासक (तज्ज्ञ)