पुणे : डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय शेड्यूल एच प्रकारातील औषधे देणारे विक्रेते आता अन्न आणि औषध प्रशासनाच्या ‘रडार’वर असणार आहेत. दै. ‘पुढारी’ने केलेल्या पाहणीत विक्रेते चिठ्ठीशिवाय औषध देत असल्याचे वास्तव समोर आले. या पार्श्वभूमीवर एफडीएने कारवाई अधिक ठोस करण्याची तयारी केली आहे.
दै. ‘पुढारी’ने केलेल्या पाहणीत काही विक्रेत्यांनी ‘ग्राहक आग्राह करतात’ किंवा ‘त्याच औषधाची पूर्वीची चिठ्ठी होती’ अशी कारणे सांगून बिनचिठ्ठी विक्रीचे समर्थन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, औषध विक्री अधिनियमानुसार डॉक्टरांचे वैध प्रिस्क्रिप्शन नसताना शेड्युल एच औषधे देणे कायद्याने गुन्हा मानला जातो. यासाठी परवाना निलंबन, दंड तसेच दुकाने सील करण्याचीही तरतूद आहे.
एफडीए लवकरच दुसरा टप्पा म्हणून अचानक धाड तपासणी मोहीम राबवणार आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विक्रेत्यांवर कठोर दंडात्मक कारवाई केली जाईल. नागरिकांनीही चिठ्ठीशिवाय औषधे देणाऱ्या दुकानांची माहिती प्रशासनाला कळवावी, असे आवाहन अधिकाऱ्यांनी केले आहे. प्रशासनाचे हे पाऊल औषध विक्रीत पारदर्शकता वाढवून रुग्णांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणार आहे.
शेड्युल 1/ 2 सारख्या औषधांसाठी नोंदवही (रजिस्टर) लिहिणे बंधनकारक आहे. नोंदवहीत रुग्णाचे नाव, डॉक्टराचे नाव व नोंदणी क्रमांक, प्रिस्क्रिप्शनची तारीख, दिलेले औषध, मात्रा, स्ट्रेंथ, औषध देण्याची तारीख, औषध विक्रेत्याची स्वाक्षरी/स्टॅम्प हे तपशील लिहावे लागतात. नोंदवही किमान 3 वर्षे जपून ठेवणे आवश्यक आहे.
शेड्युल 1 औषधे
अँटीबायोटिक्स : सेफिक्सिम, सेफट्रायॅक्झोन, लेव्होफ्लॉक्सासिन, सिप्रोफ्लॉक्सासिन
टीबीची औषधे : आयसोनीआझिड,
रिफॅम्पिसिन, पायराझिनामाइड
मानसिक आजारांवरील काही औषधे
(उदा. क्लोनाझेपाम)
शेड्युल 2 औषधे (मुख्यतः नशेचे पदार्थ/ नियंत्रित औषधे)
मॉर्फिन
कोडीन
ट्रामाडोल
फेंटानिल
शेड्युल 3 औषधे
उच्च जोखमीची, दुरुपयोग होण्याची शक्यता असलेली औषधे
उदा. काही मन:शांतीची औषधे, झोपेची औषधे
डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय शेड्यूल एच प्रकारातील औषधे देण्यास औषध विक्रेत्यांना परवानगी नाही. अशी औषधे विकणाऱ्यांवर एफडीएकडून बारकाईने लक्ष ठेवून कारवाई केली जाणार आहे.गिरीश हुकरे, सहआयुक्त, अन्न आणि औषध प्रशासन