Nira River Water Release Farmer Protest Pudhari
पुणे

Nira River Water Release: निरा नदीत पाणी सोडण्यास शेतकऱ्यांचा विरोध; कालव्याला आवर्तन देण्याची मागणी

नदीत पाणी सोडल्यास तीन टीएमसी पाणी वाया जाण्याची भीती; पृथ्वीराज जाचक यांचा तीव्र आंदोलनाचा इशारा

पुढारी वृत्तसेवा

भवानीनगर: निरा नदी कोरडीठाक पडली असून, नदीला पाणी सोडल्यास ते पूर्णपणे वाया जाईल. निरा डावा व उजवा कालव्याच्या आवर्तनावर याचा परिणाम होईल. नदीला पाणी सोडण्याऐवजी कालव्याला आवर्तन सोडण्यात यावे; अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा श्री छत्रपती कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनी दिला.

जाचक यांच्या नेतृत्वाखाली भवानीनगर येथे श्री छत्रपती, माळेगाव व सोमेश्वर या तीन साखर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांची संयुक्त बैठक घेण्यात आली. श्री छत्रपती कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक, सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष राजवर्धन शिंदे, माळेगाव कारखान्याचे संचालक योगेश जगताप, कारखान्याचे उपाध्यक्ष शिवाजी निंबाळकर, कैलास गावडे, अॅड. शरद जामदार, पृथ्वीराज घोलप, रामचंद्र निंबाळकर, गणपतराव कदम, डॉ. योगेश पाटील, अजित पाटील, संतोष मासाळ, प्रशांत दराडे, सतीश देवकाते, मंथन कांबळे, अशोक पाटील, सुचिता सपकळ, हनुमंत घोळवे, सत्यवान चव्हाण, सचिन सपकळ, अशोक काळे, सतीश काटे, विजय शिरसट, अॅड. प्रशांत पवार, सुमीत यादव, विक्रम निंबाळकर, बाबाजी निंबाळकर, लासुर्णेचे सरपंच सागर पाटील, अॅड. नितीन कदम, धनंजय रणवरे, विशाल निंबाळकर, नीलेश धापटे आदींसह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

जाचक म्हणाले की, कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे निरा डावा कालव्याला रब्बीसाठी दोन व उन्हाळ्यासाठी एक आवर्तन मिळाले पाहिजे. निरा नदीला पाणी सोडले तर ते शेवटपर्यंत जाणार नाही. याचा फार मोठा परिणाम कालव्याच्या आवर्तनावर होईल व किमान तीन टीएमसी पाणी वाया जाईल.

कालव्यातून पाणी सोडले तर निरा डावा व उजवा कालव्याच्या माध्यमातून निरा नदीकाठच्या शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत पाणी पोहचवता येईल. निरा नदीकाठचे शेतकरी देखील आपलेच आहेत. त्यांना पाणी देण्याबाबत दुमत नाही. परंतु, वाळू उपशामुळे निरा नदीपात्रात प्रचंड मोठमोठे खड्डे निर्माण झालेले आहेत. नदीला पाणी सोडल्यास मोठ्या प्रमाणात पाणी या खड्ड्यांमध्येच साचणार आहे.

निरा नदीतील पाण्याचे योग्य नियोजन होण्यासाठी नदीवरील बंधारे शासनाने सोमेश्वर, माळेगाव व छत्रपती या तीन कारखान्यांच्या ताब्यात द्यावेत. त्यामुळे बंधाऱ्यांची वेळेत दुरुस्ती करता येईल व पाणी वेळेत अडवता येईल, असे जाचक यांनी स्पष्ट केले. सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष राजवर्धन शिंदे म्हणाले की, शेतकऱ्यांनी जे विचार मांडले आहेत ते उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यापर्यंत पोहचवण्यात येतील व निरा डावा कालव्याच्या आवर्तनाचे योग्य नियोजन करण्यासाठी मागणी करण्यात येईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT