

पुणे: ‘सेफ फूड सेफ महाराष्ट्र’ मोहिमेअंतर्गत अन्न व औषध प्रशासनाने एफ. सी. रोडवरील ‘मेसर्स हॉटेल वैशाली’ आणि ‘रूपाली रेस्टॉरंट’ यांच्यावर धडक कारवाई करत त्यांचे परवाने तत्काळ निलंबित केले आहेत. तपासणीदरम्यान अन्न सुरक्षा मानकांचे गंभीर उल्लंघन आढळल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.
अन्न सुरक्षा अधिकारी अजिंक्य उमाप यांनी १३ नोव्हेंबर रोजी ‘हॉटेल वैशाली’ची तपासणी केली. यामध्ये स्वच्छतागृहांच्या लगतच कच्च्या मालाचे फ्रीजर आणि डोसा-उत्तप्पा तवा ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. तसेच, उघड्यावर अन्न साठवणूक, क्रॉस-कंटॅमिनेशनचा धोका आणि यापूर्वीच्या सुधारणा नोटिसीकडे केलेले दुर्लक्ष, यामुळे परवाना निलंबित करण्यात आला.
दुसरीकडे, अधिकारी ए. डी. झांजुर्णे यांनी ‘रूपाली रेस्टॉरंट’ची तपासणी केली असता उघडे व असुरक्षित स्वयंपाकघर, साचलेले पाणी, कचऱ्याचे अयोग्य व्यवस्थापन आणि लेबलिंगशिवाय अन्न साठवणूक अशा गंभीर त्रुटी आढळल्या.
सह आयुक्त श्रीकांत करकळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त सय्यद इम्रान हाश्मी यांनी हे आदेश पारित केले. जोपर्यंत या त्रुटी पूर्णपणे दूर होऊन लेखी परवानगी मिळत नाही, तोपर्यंत दोन्ही हॉटेल्सना विक्री, पार्सल किंवा होम डिलिव्हरी करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.