

पुणे: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्यानिमित्त रविवारी (१५ नोव्हेंबर) आणि सोमवारी (१६ नोव्हेंबर) सुरक्षेच्या कारणास्तव वाहतूकव्यवस्थेत बदल करण्यात येणार आहेत. वाहनचालकांनी पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त डाॅ. संदीप भाजीभाकरे यांनी केले आहे.
‘लोहगाव येथील हवाई दलाचा तळ ते विमाननगर रस्ता, रामवाडी ते भारत फोर्ज कंपनी, मुंढवा या रस्त्यावर रविवारी आणि सोमवारी सर्व प्रकारची वाहने लावण्यास मनाई करण्यात आली आहे. कोरेगाव पार्क येथील नाॅर्थ मेन रोड, जहाँगीर हाॅस्पिटल चौक, अभियांत्रिकी महाविद्यालय चौक, नेहरू मेमोरिअल चौक, जंगली महाराज रस्ता, टिळक चौक, टिळक रस्ता, नामदार गोपाळ कृष्ण गोखले रस्ता (फर्ग्युसन रस्ता), वेधशाळा चौक, संचेती चौक, पाटील इस्टेट, संगमवाडी ते येरवड्यातील शादलबाबा चौक, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते गोल्फ क्लब रस्ता, ५०९ चौक ते लोहगाव येथील हवाई दलाचा तळ या रस्त्यावर सर्व प्रकारची वाहने लावण्यास मनाई करण्यात आल्याची माहिती पोलिस उपायुक्त भाजीभाकरे यांनी दिली.
सोमवारी (१६ नोव्हेंबर) अमित शहा यांचा सदाशिव पेठेतील भारत इतिहास संशोधक मंडळ येथे कार्यक्रम आयोजित केला आहे. यानिमित्ताने कार्यक्रम संपेपर्यंत सोमवारी सकाळी ९ नंतर टिळक रस्ता, महाराष्ट्र साहित्य परिषद, बादशाही हाॅटेल, पेरूगेट पोलिस चौकी ते पावन मारुती मंदिर, भरत नाट्य मंदिर परिसरात सर्व प्रकारची वाहने लावण्यास बंदी घालण्यात आली आहे.
सोमवारी सकाळी ७ नंतर किराड चौक ते नेहरू मेमोरिअल हाॅल चौक मार्ग वाहतुकीस बंद करण्यात येणार आहे. या मार्गावरून जाणाऱ्या वाहनांनी किराड चौक येथून जीपीओमार्गे हाॅटेल ब्लू नाईल चौकात जावे. तेथून इच्छितस्थळी जावे. पुणे जिल्हा परिषद परिसरातील दोराबजी माॅल ते हाॅटेल ब्लू नाईल चौक हा मार्ग वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहे.
पुणे जिल्हा परिषदेत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमानिमित्त एसजीएस माॅल, पूना क्लब, लेडीज क्लब, किराड चौक, पुणे पोलिस आयुक्तालय परिसरातील गल्ली, इस्काॅन मंदिर, ब्लू नाईल चौक येथे वाहने लावावीत, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.