पळसदेव : पुढारी वृत्तसेवा
पळसदेव-काळेवाडी येथील अत्यंत गरीब परिस्थितीत जीवन जगत असलेल्या फकीर भंडारी या तरुणाने द ग्रेट खली यांच्या सीडब्लूई (continental Wrestling Entertainment) मध्ये शनिवारी (दि. 16 ) जितू चौधरीचा पराभव केला. फकीर भंडारी व जितू चौधरी या दोघांमध्ये अतिशय चुरशीचा सामना झाला. त्यामध्ये भंडारी याने चौधरीला हरवून सीडब्लूईचा बेल्ट पटकावला. या विजयाने फकीर भंडारी याने सीड्ब्लूईमध्ये दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली असून, तो अमेरिकेत होणाऱ्या पुढील लढतीसाठी तयारी करीत आहे.
फकीर भंडारी हा मूळचा बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील सुरलेगावचा रहिवासी आहे. त्याची घरची परिस्थिती अतिशय हलाखीची आहे. त्याचे आई-वडील पळसदेव काळेवाडी नं 2 येथे मासेमारी व्यवसाय करून मुलाला शिकवत आहेत. सन २०२० पासून फकीर भंडारी हा पंजाबमधील जालिंदा जिल्ह्यातील कंगनीऑल येथील द ग्रेट खली यांच्या ॲकॅडमीमध्ये सराव करीत आहे. त्याने शनिवारी सीडब्ल्यू या रेसमध्ये भाग घेतला. जितू चौधरी याच्याशी त्याचीलढत 25 मिनिटे रंगली.
लढतीदरम्यान चौधरीने भंडारी यांच्या डोक्यात खुर्ची मारल्यानंतर भंडारी हे रक्तबंबाळ झाला. मात्र अशा परिस्थितीतही फकिरने स्वतःला सावरून तीच खुर्ची चौधरी यांच्या डोक्यात मारल्यानंतर रेफ्रींनी (पंचांनी) तीन वेळ काऊंटिंग दिले; तरीही तो न उठल्याने फकीर भंडारीला विजयी घोषित करण्यात आले. या सामन्यात विजयी झाल्यानंतर सीडब्लूईचा साधारण 30 ते 35 लाख रुपये किंमत असलेला बेल्ट त्याला देण्यात आला. यावेळी पंच म्हणून राज कुंज्रा यांनी काम पाहिले. द ग्रेट खली यांनी फकिरचे अभिनंदन केले.