महाराष्ट्रातील दोन मंत्री तुरुंगात असूनही काँग्रेसचं मौन का?; जे. पी. नड्डांचा सवाल | पुढारी

महाराष्ट्रातील दोन मंत्री तुरुंगात असूनही काँग्रेसचं मौन का?; जे. पी. नड्डांचा सवाल

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाच्या राजकारणाला विरोध करण्यासाठी विरोधकांकडून लांगुलचालनाचे, विभाजनवादाचे आणि निवडक राजकारण केले जात असल्याची टीका भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा (J. P. Nadda) यांनी सोमवारी देशवासियांना लिहिलेल्या पत्राद्वारे केली आहे.

विरोधकांचे हे राजकारण बोथट ठरत चालल्याने त्यांच्याकडून आदळआपट सुरु असल्याचे सांगतानाच महाराष्ट्र मंत्रिमंडळातले दोन मंत्री तुरुंगात बंद असूनही काँग्रेस पक्षाने का मौन बाळगले आहे, असा सवालही नड्डा (J. P. Nadda) यांनी उपस्थित केला आहे. गेल्या आठवड्यात काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यासह १३ विरोधी नेत्यांनी एक निवेदन प्रसिध्दीला देत देशातील वातावरणावर चिंता व्यक्त केली होती. या निवेदनात मोदी सरकारवर टीका करण्यात आली होती. प्रक्षोभक भाषणे आणि जातीय हिंसाचारात देश जळत असल्याचे या निवेदनात म्हटले होते. विरोधकांच्या त्या निवेदनाचा नड्डा यांनी समाचार घेतला आहे.

स्वातंत्र्याच्या शंभराव्या वर्षात म्हणजे २०४७ साली भारत देश कसा हवा आहे, याचा जनतेने विचार करावा. त्यासाठी आतापासून आपण योजनांची आखणी केली पाहिजे. आजच्या युवकांना अडथळे नकोत, तर संधी हवी आहे. विरोधकांनी देखील विकासाचे राजकारण करावे, असे आपले त्यांना आवाहन आहे. अलीकडील काळात ज्या दंगली झाल्या, त्यातून काँग्रेसच्या कार्यकाळातील दंगलींची आठवण झाली आहे. इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर राजीव गांधी यांनी जेव्हा मोठे झाड पडते, तेव्हा जमीन हादरते, अशी प्रतिक्रिया दिली होती.

प. बंगाल आणि केरळ या राज्यांत भाजप कार्यकर्त्यांच्या राजरोस हत्या सुरु आहेत. महाराष्ट्रात दोन मंत्री तुरुंगात आहेत. या सार्‍यांवर काँग्रेसने का मौन बाळगले आहे? असे नड्डा यांनी पत्रात नमूद केले आहे. व्होटबँकेच्या राजकारणासाठी विरोधकांनी कित्येक दशके असामाजिक तत्वांसोबत हातमिळवणी केली. मात्र, पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीने व्होटबँकेचे राजकारण करणार्‍यांचे डोळ उघडले गेले आहेत. देशाच्या युवकांना विकास हवा आहे, विनाश नाही. विरोधी पक्षांसमोर आत्ममंथन करण्याची वेळ आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकासाचे राजकारण चालविले आहे. लोकांना नाकारलेल्या विरोधी पक्षांना ते बघवत नाही, त्यातूनच विभाजनकारी राजकारण केले जात असल्याचा आरोपही नड्डा यांनी केला आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button