Inflation index : महागाई दर १४.५५ टक्क्यांवर : बहुतांश वस्तुंचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर | पुढारी

Inflation index : महागाई दर १४.५५ टक्क्यांवर : बहुतांश वस्तुंचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा : इंधन आणि खाद्यान्न श्रेणीतील वस्तुंच्या दरात भरमसाठ वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यातील सर्वसाधारण महागाई निर्देशांक (डब्ल्यूपीआय) (Inflation index)  १४.५५ टक्क्यांवर गेला आहे. महागाई दराचा  हा गेल्या चार महिन्यातील उच्चांकी स्तर आहे. महागाईमुळे बहुतांश वस्तुंचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. महागाईमुळे होत असलेली होरपळ कधी थांबणार? असाच सवाल सध्या जनतेमधून केला जात आहे.

सरत्या फेब्रुवारी महिन्यात डब्ल्यूपीआय निर्देशांक १३.११ टक्के इतका होता. तर मार्च महिन्यात हा निर्देशांक (Inflation index) वाढून १४.५५ टक्क्यांवर गेला आहे. सलग बाराव्या महिन्यात महागाई निर्देशांक १० टक्क्यांच्या पुढे राहिलेला आहे. विशेष म्हणजे गतवर्षीच्या मार्च महिन्यात हा निर्देशांक ७.८९ टक्के इतका होता. अलिकडेच केंद्र सरकारकडून किरकोळ महागाई निर्देशांकाचे आकडे जाहीर करण्यात आले होते. हा निर्देशांकही १७ महिन्यांच्या उच्चांकी स्तरावर म्हणजे ६.९५ टक्क्यांवर नोंदविला गेला होता. दिवसेंदिवस महागाई वाढतच असल्याने सरकार, रिझर्व्ह बँकेच्या चिंतेत वाढ झाली आहे. सरत्या मार्च महिन्यात सर्वच श्रेणीतील वस्तुंच्या दरात वाढ झाली आहे.

विशेषतः कच्चे तेल, नैसर्गिक वायू, मिनरल ऑईल, बेसिक मेटल आदी वस्तुंच्या दरात सदर कालावधीत वाढ झाल्याचे अर्थ मंत्रालयाचे म्हणणे आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यादरम्यान सुरु असलेल्या युध्दामुळे कच्चे तेल महागले आहे. तर युध्द आणि कोरोनामुळे पुरवठा साखळीवर परिणाम झाला आहे. मासिक तत्वावर मार्चमध्ये इंधन आणि ऊर्जा श्रेणीच्या निर्देशांकात ५.६८ टक्क्याने वाढ झाली आहे. निर्मिती क्षेत्रातील वस्तुंचा निर्देशांक २.३१ टक्क्यांनी वाढला आहे. डब्ल्यूपीआय निर्देशांकात निर्मिती क्षेत्रातील वस्तुंची हिस्सेदारी ६४.२३ टक्के इतकी आहे. मासिक तत्वावर खाद्यान्न निर्देशांक ०.५४ टक्क्यांनी वाढला आहे. सदर कालावधीत गव्हाच्या दरातही मोठी वाढ नोंदवली गेली आहे.

हेही वाचलंत का ? 

 

Back to top button