वारजे: अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यभर भेसळ व नियमभंग करणाऱ्यांविरोधात कारवाईचा धडाका लावला आहे. पुणे शहरातही विविध ठिकाणी सुरू असलेल्या धाडसत्रांमुळे काही व्यावसायिकांमध्ये धास्तीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर कर्वेनगर येथे मुदतबाह्य शीतपेयांचा मोठा साठा मोकळ्या जागेत टाकून दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
कर्वेनगर परिसरातील वनदेवी मंदिराशेजारील मोकळ्या जागेत टेम्पोतून आणून हजारो शीतपेयांच्या प्लास्टिक बाटल्या टाकण्यात आल्या आहेत. विविध कंपन्यांच्या असलेल्या या शीतपेयांच्या बाटल्यांची मुदत संपलेली आहे.
अन्न व औषध प्रशासनाने वारजे, कर्वेनगर आणि कोथरूड परिसरात गुटखाविक्रेत्यांसह नियमभंग करणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाई केली आहे. त्यामुळे कारवाईच्या भीतीने हा मुदतबाह्य शीतपेयांचा साठा गुपचूप मोकळ्या जागेत टाकण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. सामाजिक कार्यकर्ते अशोक कदम यांनी सांगितले की, हा साठा हजारो बाटल्यांचा असून, तो लोकवस्तीच्या अगदी जवळ टाकण्यात आला आहे.
या बाटल्या लहान मुलांच्या हाती लागून त्यांनी अनवधानाने त्यातील पेय प्राशन केल्यास विषबाधेचा गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. तसेच मोठ्या प्रमाणावरील प्लास्टिक कचऱ्यामुळे पर्यावरण आणि सार्वजनिक आरोग्यावरही विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी.
आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कारवाईच्या भीतीने अज्ञात व्यावसायिकाने मुदतबाह्य शीतपेयांचा साठा या ठिकाणी आणून टाकला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे. या प्रकरणाची माहिती घेऊन संबंधितांचा शोध घेत योग्य ती कारवाई करण्यात येईल.नितीन लोखंडे, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक, वारजे-कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालय