

पौड रोड: कोथरूड येथील डेक्कन-चांदणी चौक रस्त्यालगत असलेली शास्त्रीनगर स्मशानभूमी सध्या विविध समस्यांच्या विळख्यात सापडली आहे. स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या नागरिकांसाठी उभारण्यात आलेल्या शेडच्या पत्र्यांना छिद्रे पडल्याने पावसाचे पाणी थेट आत गळत आहे. परिणामी, दुःखद प्रसंगी आप्तस्वकियांना छत्री घेऊन उभे राहून अंत्यविधी पार पाडण्याची वेळ येत असल्याने नागरिकांतून महापालिका प्रशासनाविरोधात संताप व्यक्त होत आहे.
कोथरूड परिसरातील मतदारांनी लोकप्रतिनिधींना मोठ्या मताधिक्याने निवडून दिले. मात्र, त्यानंतरही परिसरातील मूलभूत सुविधांची दुरवस्था कायम असून, याकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. नागरिकांना उन्हाळा आणि पावसाळ्यात गैरसोय होऊ नये म्हणून स्मशानभूमीत शेड उभारण्यात आले आहे.
मात्र, त्यावर बसविण्यात आलेली फायबर पत्रे अल्पावधीतच खराब होऊन त्यांना छिद्रे पडत आहेत. ही पत्रे वारंवार बदलले जात असले, तरी कायमस्वरूपी टिकाऊ साहित्याचा वापर का केला जात नाही, असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत. केवळ निधी खर्च करण्यासाठी वारंवार पत्रे बदलली जातात का? अशीही चर्चा परिसरात सुरू आहे.
पावसाळा सुरू झाल्यानंतर गळक्या छतामुळे नागरिकांच्या अंगावर पाणी पडत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे. वारंवार तक्रारी करूनही महापालिकेकडून ठोस उपाययोजना करण्यात आलेली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. दुःखद प्रसंगी आपल्या आप्तस्वकियांना अखेरचा निरोप देण्यासाठी आलेल्या कुटुंबीयांना अशा गैरसोयीचा सामना करावा लागणे ही खेदजनक बाब असल्याची भावना व्यक्त होत आहे. स्मशानभूमीतील छताची तातडीने दुरुस्ती करावी, तसेच इतर मूलभूत सुविधांमध्ये सुधारणा करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
महापालिका प्रशासनाने या स्मशानभूमीच्या छताची तातडीने दुरुस्ती करून पावसाळ्यात या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांची होणारी गैरसोय टाळणे गरजेचे आहे. तसेच स्मशानभूमीतील सर्व मूलभूत सुविधांमध्ये सुधारणा करावी.
प्रशांत कानोजिया, सामाजिक कार्यकर्ते
अंत्यसंस्कार हा प्रत्येक मृताच्या नातेवाइकांसाठी अत्यंत भावनिक, संवेदनशील आणि दु:खदप्रसंग असतो. अशा वेळी मूलभूत सुविधांचा अभाव असणे ही दुर्दैवी बाब आहे. निविदेची वाट न पाहता हे काम तातडीने होण्यासाठी महापालिका आयुक्तांकडे पत्रव्यवहार केला आहे.
अल्पना वरपे, स्थानिक नगरसेविका
स्मशानभूमीच्या कामाची निविदा प्रक्रिया भवन विभागाकडून सुरू करण्यात आली आहे. मात्र, छतावरील खराब झालेले पत्रे तातडीने बदलण्यात येतील.
सुहास जाधव, सहायक आयुक्त, कोथरूड-बावधन क्षेत्रीय कार्यालय